लेक म्हणाली, बाबा प्रेमपत्र लिहायचंय रे.. तु देतोस लिहून? बाप हसला आणि म्हणाला, तुझ्या भावना तूच चांगल्या लिहू शकते. कारण प्रेम तू केलं आहे. उधळू दे तुझ्या भावना मुक्तपणे, तुझ्या लिखाणातुन पोहचू दे तुझं उत्कट प्रेम.
पण सगळं लिहिन्यापूर्वी विचार कर. ते प्रेम समजण्याइतका प्रगल्भ आहे ना तो.? तुझ्या हळुवार भावना पोहचण्याआधी जाणून घे जपल्या जातील ना त्या.? पण तुला तरी प्रेम कळले आहे ना.?
कारण आकर्षण आणि प्रेम यात खूप बारीक रेघ असते. ती जाणून घे. मनापासून प्रेम कर. कोण काय म्हणेल, या काळजीपोटी तू त्या व्यक्त करू नये, असे काहीच नाही. डोळस प्रेम कर, वाहवत जाणार नाही.
प्रवाहात कधी दरी लागेल, मस्त झोकून दे कातळावरून पण नंतर तुझा अथांग प्रवाहीपणा तसाच राहू दे. याचा अर्थ तू प्रेम करू नये, असे नाही. तर तुमच्या भाषेत सांगायचे तर कितीही अडचणी आल्या तरी प्रेम राहिले पाहिजे.
नाहीतर 'तू ऑनलाईन होता पण मला उत्तर नाही दिले, माझ्यासोबत बाहेर नाही आला', यासारख्या प्रश्नांनी हैराण करू नको आणि त्रागा करून घेऊ नको. आकंठ बुडून प्रेम कर पण मर्यादेत राहून.
आता प्रेमाला नदीची उपमा दिली आहे. तर ती नाही का तिच्या किनाऱ्यांमधून वाहतांना जास्त चांगली वाटते. आणि हवीहवीशी वाटते. किनारे सोडून वाहू लागले की ती नकोशी होते.
प्रत्येक गोष्टीला काळवेळ असतो, तो सांभाळला म्हणजे झाले. अडचणी येतीलही.. मोठा खडक लागेलही कदाचित. पण त्याला वळसा घालून वाहता आलं पाहिजे तुला. अडकलं की साचून शेवाळत सगळं.
नाहीतर त्या खडकाला म्हणजे त्या प्रॉब्लेमना सोबत घेऊन पुढे जाता आले पाहिजे. तिथे अडकून नाही राहायचे. म्हणजेच काय तर तुझं प्रेम हे कसं असावं हे तू ठरवायचे आणि उथळ पाण्याच्या प्रवाहासारखे आवाज करत वाहायचे.
आणि काही दिवसानी इतके कोरडे की अखंडित गाज देणाऱ्या अथांग सागरासारखे. अरेच्चा, बघ. बाप आहे ना.. थोडी काळजी वाटणारच. 'तुझं' प्रेमपत्र तर नाही, पण बघ ना बेटा, 'तुला'च पत्र लिहून टाकलं.!
- दिपाली विजय (अहमदनगर)