मित्रा, अरे शेवटी हे 'कलियुग'च आहे..

आत्ता आत्ता तर होता..
कालच भेटला..
जीवन असेच क्षणभंगुर आहे.
पूर्णपणे मिळालेल्या आयुष्यात
जगण्याच्या कल्पना पुर्ण होत नाहीत,
तर या बेभरवशी आयुष्याची स्वप्न तरी किती बाळगायची..?


कमीच आहे आपलं आयुष्य...!
आयुष्य जातं कधीं, 
त्याचा पत्ताही लागत नाही..
बुडबुडा कधीं जाईल ते कळत देखील नाही,
सारे ब्रह्मांड..
त्यात आपण..
काय स्थान आहे आपलं...
बुडबुडाच ना..!

हे माझं, ते माझं, हे सोडून द्यायला हवं..
इतिहास मरणाऱ्याचा होत नाही.
तो जगणाऱ्याचा होत असतो..!
ज्यांनी कर्तुत्व केलं..
ती गेली तरी आपल्या मनात जिवंतच आहेत.

अशा व्यक्तींना रोजचं सॅल्युट करीत असतो आपण..
पण ज्यांनी लोकांना लुबाडून,
दहशत करून, फसवून,
लोकांसाठी मिळालेल्या पदाशी द्रोह करून पैसाच कमावला आहे...
त्यांच्याविषयी तुमच्या आमच्या मनात काय गरिमा असते..?
तर शून्य..!

लोकहित जपणारी माणसे होती..
आजही काही प्रमाणात आहेत..
बोटांवर मोजता येतील अशी...
नाहीतर निवडून येणारी
आता किती विचार करीत असतील शहराचा,
त्यांच्या गावाचा...?
हल्ली तर शहराचा,


गावाचा विकास करणाऱ्या संस्था
म्हणजे केवळ धंदा होऊन बसलाय..
जी आहेत त्यांनाही काही देणे नाही..
ज्यांच्यासाठी आहे,
त्यांचंही काहीच म्हणणं नाही..

जगण्याच्या व्याख्या बदलल्या..
नेत्यांचा दृष्टिकोन बदलला..
शहराने आशा करणं सोडुन दिलंय...
त्याचही खंडहर झालंय..

ज्या गावात आपला जन्म झाला,
लहानाचे मोठे झालो..
जिथे मोठेपण मिळालं..
ज्या शहराने आपल्याला जपलं..
त्याचीच मलमपट्टी करताना बेइमानी करायची
प्रचंड माया कमवायची... 
त्याच्या बळावर सत्तेचं मनगट धरून ठेवायचं

थोड पुढं चला,
मग ऐका,
मागून तुमची कशी इज्जत निघत असते. 
इथे प्रत्येक जण आपापल्या संघर्षात आहे,
त्याच्याच चिंतेत आहे..
बिचाऱ्याला भान नाही,
की तो पाण्यातून चाललाय,
की खड्ड्यातून...!

शहराची हळुवार मलमपट्टी करणारा हवा..
मायेनं त्याच्या अंगावरून हात फिरवणारा हवा..
नाहीतर रस्ता करणारा ठेकेदार
वाटच पहात असतो,
कमी डांबरात तयार केलेला
रस्ता खराब कधी होतो
व पुन्हा त्याचं रस्त्यांचं काम घेतो कधी
काय बोलावं याला...?

हे सत्य आहे .. 
काहीं मोजके सोडुन...
तुमच्या घरात चोरी झाली
की तुम्ही किती अस्वस्थ होता...!
मग इथेही तुमच्या सामुदायिक पैश्यावर
भरदिवसा डल्ला मारला जात असेल तर... ?
आक्रोश का नाही होतं तुमचा..?

मित्रा,
हे कलियुग आहे..
एव्हढंच...
जी माणसे प्रामाणिक, कल्याणकारी आहेत,
त्यांच्यावर दुनिया टिकून आहे..
अन्
जी माणसे रांगेत पैसे घेत आपलं मत विकतात
तोच तर कलियुगाचा अनुभव आहे..

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !