पिंपरी चिंचवड - मुलीचे विवाहयोग्य वय १८ की २१ यावर सविस्तर चर्चा व्हावी, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जावा, अशी मागणी लेक बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री मनीष गाडे यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या गाडे यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार शरद पवार यांनाही लेखी पत्र पाठवले आहे. मुलीच्या लग्नाचे वय २१ करण्याचा संदर्भात केंद्र शासन निर्णय घेत आहे.
या निर्णयाची घाईघाईत अंमलबजावणी करू नये, या विषयावर विस्तृत चर्चा व जनजागृती करावी, नंतरच पालकांच्या संमतीने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती जयश्री गाडे यांनी केली आहे.
मुलाच्या वा मुलीच्या विवाह योग्य वयात अंतर असावे असे तज्ञांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. दोहोंचे लग्नाचे वय समसमान करण्यासाठी कुठलाही वैद्यकीय पुरावा किंवा ठोस आधार आहे का, हे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले नाही.
मुलींच्या लग्नाचं वय वाढवून सरकार काय साधणार आहे, असा सवाल देखील गाडे यांनी उपस्थित केला आहे. कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याचे निर्णय घेण्यापेक्षा सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत असेही जयश्री गाडे यांनी सुचवले आहे.
खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलींना सरकार एक रुपयाही अनुदान देत नाही. मग मुलीच्या लग्नाचे वय वाढवले तर तोपर्यंतच्या तिच्या अतिरिक्त शिक्षणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे का, असा सवाल देखील गाडे यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकार दुसऱ्याच निर्णय घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.