'गोडगोड' बोलणाऱ्यांना तिळगुळ मिळतात. भीडभाड न बाळगता, जे थेट बोलतात, त्यांच्यावर मात्र 'संक्रांत' ओढवण्याचा हा काळ आहे..! अशावेळी आपण कोणासोबत आहोत..?
खरे म्हणजे आपण सारेच गोड आहोत. गोड असायला हवेही. का बरे कटुता आणि कशाला कडवट वा तिखट बोलायला हवे? असे बोलण्याची वेळ येऊ नये हे खरे, पण तरीही प्रसंगी आत्यंतिक झोंबणारे असे काही बोलावे लागते. अनेकांना दुखावणारे असे मांडावे लागते. कोणाला हेतूतः दुखावणे, कोणी दुरावणे हा त्या मागचा हेतू नसतो. नसावा.
लोक दुखावण्याची पर्वा केली असती, तर पंधराव्या शतकात पोलंडमध्ये जन्मलेल्या कोपर्निकसाने सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, हे तेव्हाचे प्रस्थापित प्रमेय मान्य केले असते. पण, त्याने भीडभाड न बाळगता सांगितले - केंद्रस्थानी सूर्य आहे. पृथ्वी नाही. त्याच्या पुस्तकावर बंदी लादली गेली. कोपर्निकस आजारी पडून मेला, म्हणून वाचला.
पण, त्याचे हे पुस्तक पुढे जर्दानो ब्रूनो या वैज्ञानिकाच्या हाती लागले. त्यावर त्याने आणखी काम केले. 'पृथ्वी गोल आहे आणि ती अविरत सूर्याभोवती फिरते. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही', हे त्याने सांगितले. सिद्ध केले.
पण, धर्मसत्ता खवळली. 'बायबल'मध्ये जे आहे, त्याच्या विपरित कोण कसे सांगू शकते, म्हणून चवताळली. ब्रूनोला चर्चने अटक केली. त्याची जीभ कापली. रोमच्या चौकातून त्याची नग्न धिंड निघाली. त्याला जिवंत जाळले गेले.
तरीही, ब्रूनो संपला नाही. त्याच रोमन साम्राज्यात गॅलिलिओ जन्माला आला. त्याने सतराव्या शतकात हीच मांडणी पुढे नेली. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. म्हणून तर दिवस उजाडतो, रात्र होते. म्हणूनच तर ऋतूंचे सोहळे इथे दिसतात. गॅलिलिओला नोबेल नाही मिळाले. अटक झाली.
त्या अटकेतच तो मेला. पण, नजरकैदेतही त्यानं पुस्तक लिहिलं आणि जगाला कैदमुक्त नजर दिली. ही नावं माहीत तरी आहेत. असे किती असतील, ज्यांची कुठे नोंदही नाही! अशी ही माणसं बोलत राहिली. मांडत राहिली. भांडत राहिली.
तेव्हा कैक दुखावले, पण त्यामुळेच तर उजाडले ना..! आजचा 'मकर संक्रांत' हा दिवसच मुळी पृथ्वीचे प्रेमगीत ऐकवणारा. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा टप्पा दाखवणारा. समुद्राला नवी गाज देणारा. शेतीचे - मातीचे नाते सांगणारा. त्याच्यावर ना धर्माचे ओझे, ना कोणत्या अस्मितेचे त्याला काही देणेघेणे.
मकर राशीत प्रवेश करणारा सूर्य. उत्तरायण सुरू होते आणि मग संक्रांत येते. आजचा दिवस खरोखरच सणासारखा साजरा करण्यासारखा. संक्रांतीला आज गोड बोलण्यासाठी कित्येकांनी स्वतःला जिवंत जाळून घेतले. तुरूंगवास भोगले. जिभा कापल्या गेल्या.
तेव्हा हे लोक तिखट बोलले नसते, तर आज असे उजाडले असते.? आज तरी आपण कोपर्निकस - ब्रूनो - गॅलिलिओची वाट चोखाळणार की त्याच नादान, बेमुर्वतखोर धर्मांध सत्तेच्या वाटेने चालणार.?
गोड बोलायचं हे खरंच. पण मला सांगा. खरा गोड आवाज कोणता? साखळदंड खळाखळा तुटण्याचा. तो गोड आवाज सर्वांना, सर्वदूर ऐकू यावा म्हणून थोडे तिखट बोलावे लागेलही. पण, त्याशिवाय 'उत्तरायण' कसे सुरू होणार..?
गॅलिलिओच्याच काळात, ज्याला सदेह वैकुंठाला धाडले गेले, त्या आपल्या बापाने, साक्षात तुकोबानेच सांगून ठेवले आहे -
पुढे आमचा बा तुकोबा काय म्हणतो, ते पाहा. मायबापापेक्षाही आम्ही मायाळू आहोत, पण प्रसंगच आला तर शत्रूपेक्षाही अधिक घातपात करू. अमृताहून आम्ही गोड खरे, पण वेळ आलीच तर, विषही लाजेल, असे कडू आहोत आम्ही..!
त्यामुळे, आपण आहोत गोडच. पण, अवघे जग गोड व्हावे, अशी मनोकामना असेल, तर प्रसंगी कडवटपणा घ्यावा लागेल. सध्या तरी चित्र असे दिसते आहे की, संक्रमण सुरू झाले आहे. बदल होऊ पाहातो आहे. आणखी जोर लावू.
गोड असो की तिखट, पण प्रत्येकाला बोलता येईल, प्रत्येकाला आवाज मिळेल, यासाठी बोलत राहू. चालत राहू. संवाद हीच तर माणसाची भूक आहे. जगण्याचे प्रयोजन आहे आणि पूर्वअटही.
संक्रांतीच्या आज अपार, आभाळभर सदिच्छा. ना पृथ्वी थांबली कधी, ना सृष्टी थांबते. मग आपण का थांबायचे? अविरत चालत राहायचे. मकर संक्रांतीच्या याच तर सदिच्छा.