शेवगाव - आधीच गेली अडीच ते तीन वर्षे कोरोना महामारीच्या संकटाने घरात लॉक केले आहे. कलेची सर्व सादरीकरणे बंद आहेत. आता कुठे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना ओमायक्रॉनच्या धसक्याने सर्वांना पुन्हा चिंचेत टाकले आहे. शेवगावचे ज्येष्ठ कलावंत तर आणखीनच त्रस्त आहेत.
समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कलावंतांची हेळसांड होत आहे. या विरोधात सोमवारी (३ जानेवारी) दुपारी १२ वाजता आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष रामकिसन तापडिया यांनी हा इशारा दिलेला आहे. यामध्ये इतर कलावंतही सहभागी होतील.
रामकिसन महाराज तापडिया हे ज्येष्ठ कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य आहेत. त्यांच्यासह इतर जेष्ठ कलावंत, महिला कलाकार यांनी समाज कल्याण अधिकारी यांच्या दालनात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यांना समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याची तक्रार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांना या समितीने यापूर्वीही लेखी निवेदन दिले होते. तापडिया यांच्यासह त्यांचे इतर कलावंत समाज कल्याण अधिकारी यांच्या दालनात तीन दिवसांपूर्वीच आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी गेले होते.
परंतु, तेथेही उडवाउडवीची उत्तरे या कलावंतांना ऐकायला मिळाली. त्यामुळे या आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झालेल्या कलावंतांची हेळसांड झाली, असे तापडिया महाराज यांनी म्हटले आहे. या आंदोलनासाठी नेवासे, शिर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, नगर या ठिकाणाहून कलावंत आले होते.
आमच्या आंदोलनाला पोलिस कर्मचारी, समाज कल्याण कार्यालयातील जाधव मॅडम, औटी यांनी उपस्थित राहून कलावंतांना सहकार्य केले. पण प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे कलावंतांना आर्थिक मानधन मिळावे, या मागणीसाठी सोमवारी पुन्हा आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे तापडीया महाराजांनी सांगितले.