आजच्या घडीला माहिती, मनोरंजनाचे अनेक अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. पण रेडिओचे माधुर्य आवड कित्येक रसिकांच्या मनात तशीच्या तशी आहे. हृदयापासून कानापर्यंत सुरु झालेल्या हा प्रवास मी तरी जन्मापासून अनुभवला आहे.
बाबा राजकीय व्यक्तिमत्व असल्याने सकाळी लवकरच त्यांचा दिवस सुरु होई. मात्र ते सकाळी सांगली आकाशवाणीवर असलेले मंगलप्रभात लावत. इतकी सुरेख भजनं, गीतं असत की सकाळ भारी आणि मंगलमय असायची.
आता आपण भारतीय आकाशवाणीचा प्रवास पाहू. अगदी प्रथम पासून. रेडिओ कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची यंत्रणा. भारतात नभोवाणीचा विकास गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षातच झालेला आहे.
सन १९२६ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या एका खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई व कलकत्ता येथे अनुक्रमे २३ जुलै व २६ ऑगस्ट १९२७ रोजी दोन रेडिओ केंद्रे सुरू केली.
या केंद्रांची कार्यक्रम ४८ किमी. च्या परिसरातच ऐकू येण्याची व्यवस्था होती. या सुमारास देशात १,००० रेडिओ परवाने होते. १९२७ च्याही अगोदर भारतात नभोवाणीचा प्रसार खाजगी हौशी क्लबांद्वारा झालेला होता.
सन १९२४ मध्ये मद्रास येथे पहिला रेडिओ-क्लब स्थापन झाला. हौशी रेडिओ-क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर व डेहराडून येथे चालवले जात होते. सरकारने भावी काळात स्थापलेल्या रेडिओ केंद्रांचे हे 'रेडिओ क्लब' अग्रदूत ठरले.
म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद ह्या पाच ठिकाणीही नभोवाणी कार्य चालू होते. म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी स्वीकारले.
परदेशी वृत्तपट व इंग्रजीमधून प्रसारित होणाऱ्या वार्तापटांच्या वेळी मात्र ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे संबोधण्यात येऊ लागले. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी १ मार्च १९३० मध्ये बुडाली व भारत सरकारने लगोलग नभोवाणी कार्य स्वतःकडे घेतले.
१९३६ मध्ये लायोनल फील्डन ह्यांनी नभोवाणी प्रमुख ह्या नात्याने सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली. स्वातंत्र्योत्तर काळातच आकाशवाणीचा खऱ्या अर्थाने विकास होत गेला. आता सुध्दा वेगवेगळी खाजगी आकाशवाणी केन्द्र आहेत.
पण भारतीय आकाशवाणी म्हटल्यावर विविधभारतीचं आठवते. मन त्या साऱ्या आठवणीत मन रमून जातं. अमीन सयानीच्या जादुई आवाजाला लोक अजूनही मिस करतच आहेत.
विविधभारती दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम, अवीट गाणी सादर करत असते. माझी सकाळ आकाशवाणीने सुरु होते. खेड्यापाड्यात अजूनही रेडिओ सर्रास वापरतात. आकाशवाणी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते.
गृहिणी आणि बालगोपालांसाठीही वेगवेगळे कार्यक्रम असतात. आता 'कारवा'ने घरात प्रवेश केलाय. पण मला मात्र माझा 'सोनी'चा रेडिओ प्रिय आहे. दिवसभर सोबत करतो चित्र काढताना, लिहिताना, कुंचला आणि लेखणीला सोबत असते ती विविधभारती, कधी कोल्हापूर, तर कधी पुणे आकाशवाणीची.
कोल्हापूर आकाशवाणीवर माझे कविता वाचनाचे, स्त्रीभ्रृणहत्या नाटिके, पर्यावरण नाटिकेचे कितीवेळा तरी कार्यक्रम झालेत. एक भावूक आठवण सांगते, बाबा गेल्यावर दादा म्हणाला, "तुला कांही हवं का बाबांचं घेऊन जा.."
मी आतून खूप तुटले होते. बाबा माझा सर्वस्व होता. मी काही नको म्हणाले. तर माझी चौदा वर्षाची मोठी लेक प्रियंका म्हणाली, "मां,आपण बाबांचा रेडिओ नेऊया का ? त्यांनी कित्ती वेळा हातात घेतला असेल ना..!"
ऐकणाऱ्या साऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. आयुष्यात कसलाही हट्ट न करणारी ही माझी शहाणी लेक सासरी जाताना मात्र हट्टाने तोच जुना रेडिओ घेऊन गेली. मलाही वाटतं बाबा दिदुली तुझ्यासोबत आहेत..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)