कुणालाच काहीनवाटेनासं झालंय. प्रत्येकाचं स्वप्न निराळं. त्याचं त्याच्याच पुरतं. कसं जगाव.? हसत, खेळत, मित्रांसोबत दंगा मस्ती करत. आता ही संज्ञा केव्हाच मोडकळीस आलीय..
जसा एखादा जुनाट वाडा नजरेस पडावा, भिंती ना भेगा.. दारे मोडकळीस आलेली. सगळं संपलं. आपलेपण, माणुसकी, आसक्ती मित्रांची. ओढ नात्यांची.. यापेक्षा फायद्याचा कोण..? या बेरीज वजाबकीत नातं नाही तर संबंध ठरलेले.
चार जण भेटली की बोलण्यापेक्षा मोबाईलमधे सगळं लक्ष. पण खरं सांगतो, गेली ती मजा. लहानपणी मित्रांचा वाढदिवस साजरा करण्याची. मधल्या सुट्टीत एकत्र बसून डबा खाण्याची.
एक चॉकलेट अर्धा अर्धा करून खाण्याची. गोट्या खेळण्याची, बिल्ले जिंकण्याची. विट्टी दांडू आता दिसत नाहीत. उंच उडालेली विट्टी झेलन्याचा आनंद तरी कशात मोजावा. आतुकली भातुकली आता होत नाही.
मित्राच्या बहिणीच्या लग्नात पाणी वाटता येत नाही. कटींगच्या दुकानात केस कापताना रडण्याचे दिवस केव्हाच संपले. पगार झाल्यावर बाबा घरी खाऊ घेऊन यायचा. तो आनंद वेगळा होता. आता पगार झाला तरी आपले चेहरे सुकलेलेच.
तेव्हा खाऊ असायचा, मुलांना हे माहीत नाही. सायकलच्या दुकानात एक तास भाड्याची सायकल आता मिळत नाही. एक तासाला दहा मिनिटे राहिल्यावर जोरात पळवायची मजा केव्हाच विरून गेली. ती मजा केव्हाच गेली.. केव्हाच गेली..
- जयंत येलुलकर (अहमदनगर)