अहमदनगर - नेवासे कोर्टात वकिली व्यवसाय करणारे सुर्यकांत लिपाने यांना सापडलेले ५४ हजार २०० रुपये त्यांनी बांधकाम मजुराला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सुर्यकांत लिपाने (रा. नेवासा फाटा) हे कामानिमित्त नेवासा फाटा येथील सुकल्पना अर्बन बॅंक मल्टी. निधी लि. याठिकाणी कामानिमित्त गेले होते. तेथील काम करुन परत जात असताना रोडवर त्यांना नोटांचा बंडल पडलेला दिसला.
आजुबाजूस कोणीही दिसत नव्हते. त्यांनी तो नोटांचा बंडल घेतला व परत सुकल्पना बॅंकेत गेले. त्यांनी बॅंकेचे मॅनेजर निलेश रासकर यांना माहिती दिली. पैसे मोजले असता ते ५४,२०० रुपये होते.
या परिसरात एका इमारतीचे नवीन बांधकाम चालू होते. तेथे गोविंद बिहारी हा परप्रांतीय मंजुर त्यांचे इतर मजुरांबरोबर काम करत होता. ते पैसे त्या मजुरांचे त्यांचे मजुरीचे आलेले आहेत, अशी खात्री झाल्याने ही रक्कम मजुरांना परत केली.
सुर्यकांत रामनाथ लिपाने हे अहमदनगर जिल्हा परिषदेत औषधनिर्माण अधिकारी होते. ते उस्थळदुमाला या प्राथमिक आरोग्य केंद्रातुन सेवानिवृत्त झाले असून ते सध्या नेवासा कोर्टात वकिली व्यवसाय करतात.