प्रिय मायमराठी, तुच शिकवलंय भाषेने माणसं जोडायची असतात.. तुझ्याशी आज थोडं हितगुज करावसं वाटलं. आपण मनातच आपल्या जिवलगांना खूप वेळा पत्र लिहतो. पण सारीच पत्र पाठवत नाही. काही पत्र मनात उमलतात. आणि.. असो..
माय, आजूबाजूच्या जगातून मिळणाऱ्या ज्ञानाला, सौदर्यांला, आनंदाला, भरभरुन प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा. माहेरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि आपलेपण मातृभाषेत असतं. म्हणून आपल्या भाषेचा अभिमान भावनिक पातळीवर येऊन ठाकतो.
पण मायमराठी, तु मला माझ्या जन्मदात्या मायसारखीच प्रिय आहेस. इंग्रजाकडून एक मोठ्ठा गैरसमज आपण आत्मसात केला आहे. गोरा तो सुंदर आणि इंग्रजी बोलणारा हुश्शार. यात आपण आपल्या मातृभाषेचा अपमान करतो, हे सुजनांच्या लक्षात येत नाही.
माय तुला सांगते तुझ्या कुशीत हिंदी इंग्रजी शब्द हल्ली बेमालुम शिरताना दिसतात.. माय तुही त्यांना मायेनं जवळ करतेसही. सुरेश भट एका कवितेत म्हणतातही..
'पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,
अपुल्या घरी हाल सोसते मराठी
हे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी..'
अस असलं तरी माय, आज मराठी माणसाशी, मराठी माणसाशी मराठी भाषेत बोलायला लाज वाटते हे कटु सत्य आहे. ज्ञानेश्वर म्हणतात,
उध्दरिला ज्ञानदेवे जगती
मायबोली मराठी भाषा
अमृताची घेऊन ती गोडी
जगी वाढेल मराठीभाषा
असा माय तुझ्याविषयी माऊलीला विश्वास होता. माय, २७ फेब्रुवारी तुझा दिवस. ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसमाग्रजांचा वाढदिवस. कुसुमाग्रजांनी लिहिलंय,
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
तिच्या संगाने जागल्या
द-याखो-यातील शिळा
तुझ्या शब्दांनी सह्याद्रीच्या शिळा गाजल्या. पण आज तुला वाचविण्यासाठी धडपड करावी लागतेय.. जगभरातील शिक्षणतज्ञ सतत सांगताहेत, मातृभाषेतून मूलभूत शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी अधिक चांगली प्रगती करु शकतील. कारण मातृभाषा आकलनीय व भावनात्मक महत्व असलेली आहे.
एक ब्रिटिश भाषातज्ञ म्हणतो, स्वभाषा सोडून जे अन्य भाषेत शिक्षण घेतात, त्यांना कालांतराने मातृभाषा निरुपयोगी वाटू लागते... आणि माय मराठी तु पहाते आहेस हे घडत आहे.
माय, तुला सांगते मराठी दिनाच्या या आभासी जगात वेगवेगळ्या माध्यमातून तुझ्या दिनाच्या शुभेच्छांचे संदेश भ्रमणध्वनीवर फिरत रहातील.. पण माय तुला सांगते मराठी दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा इंग्रजाळलेलं मराठी आम्ही वापरत राहू...
अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही ही फक्त बातमी असते माय आम्ही संवेदनाशून्य जीवन जगतो आहे. माय, यांना कळत नाही भाषा फक्त संपर्काचे माध्यम म्हणून नसते. भाषेला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैयक्तिक असे अनेक पदर आहेत, आणि म्हणूनच माय तू आमच्या जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे.
तुझं अस्तित्वच धोक्यात आलय.. तुझं अस्तित्व आमच्यासाठी कायमच महत्त्वाचे आहे. तुझं अस्तित्व रहावं, म्हणून फक्त शासनाने काम करावं ही अपेक्षा न ठेवता आपणही आपल्या मायमराठीसाठी मराठीचाच आग्रह धरला पाहिजे ना... माय तुच तुझ्या लेकरांना आपली भाषासंस्कृती जतन होण्यासाठी बुद्धी दे.
वर्षानुवर्षे महाराष्ट्रातच रहातात मोठे होतात पण मराठी बोलणं नको वाटत ग कितीतरी लोकांना. आम्ही त्याचं मन राखण्यासाठी त्यांच्या मातृभाषेत बोलत रहातो. कारण तुच शिकवलंयस भाषेन माणसं जोडायची असतात.
मायमराठी तुला उदंड आयुष्य लाभो हीच या सावित्रीच्या लेकीकडून अपेक्षा. तुझीच.. तुझ्यावर अखंड प्रेम करणारी..
- स्वप्नजा घाटगे,
संपादिका, सखीसंपदा (कोल्हापूर)