अहमदनगर - बुधवारी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातून कार्यकर्त्यांसह आमदार, खासदार उपस्थित होते.
पक्ष फुटल्यानंतर पवार साहेब काय बोलणार, याकडे जमलेल्या सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. पवार साहेब यांनी बोलण्यासाठी माईक हातात घेतला आणि तेवढ्यात गर्दीतून एक आवाज आला.
'हिंदुस्थानचा बुलंद आवाज... शरद पवार... शरद पवार...', 'अरे हमारा नेता कैसा हो.. पवार साहेब जैसा हो..', अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. सभागृहामध्ये जमलेल्या सर्व आमदार, खासदार व कार्यकर्त्यांसह पवार साहेबांचे देखील लक्ष या कार्यकर्त्याने वेधलं होतं.
तो कार्यकर्ता होता राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष शुभम बंब. नेवासा तालुक्यातील सोनई येथील शुभम बंब या कार्यकर्त्याने दिलेल्या घोषणांनी सभागृहामध्ये बसलेल्या सर्वांचेच रक्त सळसळले होते.
या बुलंद आवाजाचे आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शुभम बंबचे कौतुक केले. याच घोषणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.