मुंबई - कालपासून मणिपूर राज्यातील जी दृश्य समाजमाध्यमांवर समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
ठाकरे म्हणाले, मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती, की आता तरी या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे.
या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी यात लक्ष घालायला हवं, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे. यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
पंतप्रधानांनी आत्ता जरी या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.