ऍड. उमेश अनपट (नाशिक) - येथील अधिवक्ता ॲड. मंदाकिनी शिवाजी भोसले यांची नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी बुधवारी (ता. १२) आपला पदभार स्वीकारला. सर्वसामान्य कुटुंबातील भोसले यांनी जिद्द व कठोर परिश्रमाने नुकतीच न्यायाधीशपदाची परिक्षा उत्तीर्ण करत यशाला गवसणी घातली.
लातूर जिल्ह्यातील औसामधील गुळखेडावाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. एका शेतकरी कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या भोसले यांनी लग्नानंतर घर व संसार सांभाळत १४ वर्षापासून वकिली केली.
त्यांनी आजपर्यंत नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील न्यायालयात गुन्हेगारी केसेस चालविल्या आहेत. त्यासोबत अभ्यास करत यशाला गवसणी घातल्याने केलेल्या कठोर परिश्रम व अविरत मेहनतीचे आज चीज झाल्याचा मोठा आनंद त्यांच्या कुटुंबीयांना झाला आहे.
न्यायाधीश प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांच्याकडून स्वागत : नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाच्या न्यायाधीश प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त अध्यक्षा मंदाकिनी भोसले यांचे स्वागत केले.
वकील संघाकडून स्वागत : नाशिक कंझ्युमर ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. चांदवडकर, सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता अभ्यंकर, ॲड. कचोळे, ॲड. अष्टपुत्रे, ॲड. शेळके, आदीसह इतर सदस्य अधिवक्ते यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त अध्यक्षा भोसले यांचे स्वागत केले.
कामाला येणार गती : मार्च 2023 पासुन नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे येथील काम प्रभावित झाले होते. मात्र, आता अध्यक्षपदी भोसले यांची नियुक्ती झाल्याने येथील कामाला गती येणार आहे.
पदभार स्विकारताच कामाला सुरुवात : नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आज सकाळी स्विकारताच त्यांनी थेट डायसवर जाऊन विविध निवाडे हाताळत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
तत्पर न्यायासाठी प्रयत्नशील : न्यायाधीश मंदाकिनी भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नागरिकांनी अवश्य जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाद मागावी. तसेच तत्परतेने न्याय देण्यासाठी मी कटिबध्द राहील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय सदरचे पद मध्यंतरी रिक्त असल्यामुळे काहीशे प्रभावित झालेल्या कामास पुन्हा गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे देखील त्यांनी 'MBP Live24' शी बोलताना सांगितले.