अहमदनगर शहराला आयटी उद्योग क्षेत्रात मोठा वावं मिळू शकतो, या हेतूने या संदर्भातील पुण्यात आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात अहमदनगर महानगरपालिकेने आपला सहभाग नोंदविला होता.
म.न.पा चे तत्कालिन आयुक्त रमेश पवार व उपायुक्त सुधाकर देशमुख यांच्या पुढाकाराने मनपा या प्रदर्शनात सहभागी झाली होती. आपल्या शहराला स्वताच्या परिघा बाहेर नेण्याचा हा स्तुत्य प्रयत्न होता.
त्यावेळी त्यांना बांधकाम क्षेत्रातील देशातील अग्रगण्य, आदरणीय व्यक्तीमत्व बी जी शिर्के यांच्या निवासस्थानी या संबंधात चर्चा करण्यासाठी घेऊन गेलो होतो. शिर्के साहेबांचा राज्यातील शहरांचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास, या संदर्भातील त्यांना असलेली सखोल माहिती यामुळे त्यांच्याशी झालेली चर्चा शहरासाठी मोलाची होती.
त्यानंतरच्या काहीच दिवसात पवार व देशमुख यांची बदली झाल्यामुळे पुढे यासंदर्भात काही झाले नाही. परंतु 'अहमदनगरला आयटी क्षेत्रात मोठा वाव आहे', हे बी जी शिर्के साहेब यांनी सांगितलेले शब्द कायमचे लक्षात राहिले. कोणी खरेच मनावर घेतले तर आपले शहर या क्षेत्रात अग्रगण्य होऊ शकेल.
शेजारी पुणे, औरंगाबाद अशी मोठी शहरे आहेत. खरेतर या संधीचा लाभ आपण घ्यायला हवा. असे काही झाले तर आयटी नोकरीच्या निमित्ताने आपल्या शहरातून पुण्यात, बंगलोर, चेन्नई आदी मोठ्या शहरांत गेलेली तरुणाई निदान आपल्या घरी आई बाबांजवळ तरी परत येईल.
- जयंत येलुलकर (अध्यक्ष, रसिक ग्रूप, अहमदनगर)