बा मृगा, गाजत वाजत आज तु निघालास ना.? 'या नभाने भुईला दान द्यावे' असं महानोरांच्या भाषेत मन बोलू लागले आहे. तर तुझ्या स्वागता गदिमा म्हणताहेत, 'माऊलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्या परी, तोंड पसरे शिवार...!'
म्हणजेच 'ह्या भुकेल्या शिवाराच्या मुखात तुझे थेंब येऊ देत.. चैत्र पालवीने भरलेलं कोवळ्या पिंपळपान तुझ्या वर्षावात न्हाऊन निघू दे.. सुकत आलेल्या नद्या, काठावरची झाडं पुन्हा लवकर लवकर बोलू देत. ओढा, विहिरी गच्च भरून वाहू देत.. ये रे मृगा आता तुझीच वाट पहातेय..
बळीराजाचं मन वैशाख वणव्यात होरपळून गेलय.. त्याच्या डोळ्यात मिरग तू केव्हाचाच दाटलायस.. फाटक्या कपड्यातील बळीराजा तुझ्या स्पर्शाने जंगलातील त्या मृगाप्रमाणे उड्या मारायला हवा.
बा मृगा ये रे.. त्याच्या आयुष्यात तुझ्या येण्याने होणारा आनंद अवीट असतो. ये बाबा ये. धरणीला पडलेल्या भेगा बळीराजाच्या छाताडावर पडत असतात. आलास की कितीही श्रांत झालेली धरणीमाय तुला मायेनं कवेत घेईल तुलाही आराम मिळेल.
आणि ओलसर झालेल्या त्या मातीच्या गर्भातून किती बीजे गाणी गात तरारुन उठतील. तुझ्या स्वागतासाठी माझा प्राजक्तही सडे टाकू लागलाय.. बस्स तुम आ जाओ..!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)