अहिल्यानगर - जिल्ह्यात वाढत चाललेल्या ऑनलाइन ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) प्रकारातील फसवणुकांना आळा घालत अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशनने (Cyber Police Station) मोठी कामगिरी बजावली आहे. तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना अटक करून प्रकरणाचा धागा पकडण्यात यश मिळवले आहे.
फिर्यादी संदीप हरिभाऊ कुलथे (रा. सावेडी, अहिल्यानगर) यांना २४ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वेगवेगळ्या मोबाईल (Mobile) नंबरवरून फोन व व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्स (Video Calls) आले. स्वतःला 'मुंबई सायबर सेल' मधून बोलत असल्याचे सांगितले.
त्यांनी फिर्यादीवर मनी लॉन्ड्रिंग, हवाला आणि ‘आयडेंटिटी थेफ्ट’ (Identity Theft) प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा खोटा आरोप करून त्यांना डिजिटल अटक करण्यात आली. भीती दाखवून फिर्यादीकडून एकूण ₹ 8 लाख 80 हजार रकमेची फसवणूक (Cheating) करण्यात आली.
याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. 318(4), 336(3), 340(2) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(D) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तपासाची दिशा बदलणारी तांत्रिक छाननी - पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने अत्याधुनिक तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स (Call Details), बँक ट्रेल (Bank Trail) व डिजिटल लोकेशन्सच्या (Digital Locations) आधारे संशयितांचा माग काढला.
या पोलिस पथकात उपनिरीक्षक सुदाम काकडे आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, निळकंठ कारखेले, रावसाहेब हुसळे आदींचा समावेश होता. या तपासातून खालील आरोपी निष्पन्न होऊन अटकेत केले आहेत.
- विजय रंगनाथ चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर)
- अभिजित अजिनाथ गिते (रा. दादेगाव ता. आष्टी, सध्या पुणे)
- अक्षय संजय तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासा, सध्या हिंजवडी, पुणे)
अधिक चौकशी केली तेव्हा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे. या टोळीने अन्यही आर्थिक गुन्हे केल्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध करत आवाहन केले आहे की,
- अनोळखी लिंक, कॉल, व्हिडिओ कॉल, पेमेंट रिक्वेस्ट, OTP यांवर विश्वास ठेवू नका.
- कोणत्याही “डिजिटल अरेस्ट”, “कायदेविषयक नोटीस”, “पोलीस/CBI/ED” अशा नावाने येणाऱ्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नका.
- फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 किंवा 1945 वर संपर्क साधा.
अहिल्यानगरमध्ये वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या घटनांवर ही कारवाई मोठे यश मानले जात आहे. तसेच सायबर पोलिस पथकाच्या तांत्रिक दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
