मढी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद; एलसीबीची कारवाई


अहिल्यानगर - पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध कानिफनाथ गड (मढी) (Kanifnath Gad Madhi) परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.

मढी घाटात सापळा रचून पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील आरोपींवर पुणे (Pune), सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खून आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अशी झाली कारवाई : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात दरोडा आणि रोड रॉबरीच्या (Robbery) घटना रोखण्यासाठी गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ७ मार्च रोजी मढी यात्रा बंदोबस्तावर होते.

पेट्रोलिंगवर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही सराईत गुन्हेगार मढी ते पाथर्डी रोडवर शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले आहेत. पथकाने तातडीने मढी घाटात अंधारात छापा टाकला.

यावेळी संशयास्पदरीत्या थांबलेल्या टोळीतील चौघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले, तर त्यांचे काही साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

ताब्यात घेतलेले आरोपी : 
  1. आकाश मोहन डुकरे (वय २६, रा. विजयनगर, पाथर्डी)
  2. विकास उर्फ सुनील दत्तू म्हस्के (वय २५, रा. माणिकदौंडी चौक, पाथर्डी)
  3. आदित्य दीपक बोरकर (वय २३, रा. राहुरी)
  4. शरद श्रीरंग जाधव (वय ४०, रा. अंबड, जि. जालना)

पकडलेले आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आकाश डुकरे याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल असून, पुणे ग्रामीण (जेजुरी) आणि सातारा (कराड) येथेही जबरी चोरीचे गुन्हे आहेत.

विकास म्हस्के याच्यावर राहुरी, पाथर्डी आणि देहू रोड (पुणे) येथे चोरी व जबरी चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. तर आदित्य बोरकर याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. अंतर्गत ५ विविध गुन्हे दाखल आहेत.

आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक अनंत सालगुडे, विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !