हे शहर विकसीत, प्रगत, समृद्ध झालं, तर सर्वांनाच फायदा. नाहीतर..


विधानसभेसाठी लढत कुणाकुणामध्ये होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. ही निवडणूक लढवणार्‍या प्रत्येक उमेदवारानं या शहराचं भलं कसं होईल, याचा विचार केला पाहिजे. हे शहर विकसीत झालं, औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालं, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झालं, तर इथं राहणार्‍या सर्वांनाच त्याचा फायदा होईल. फक्त आमचं भलं होऊ दे, शहर खड्ड्यात गेलं तरी चालेल, ही प्रवृत्ती मारक ठरेल.


हे शहर पुढं नेण्यासाठी, इथं रोजगार निर्माण करण्यासाठी, प्रत्येक नगरकराचं जीवनमान उंचावण्यासाठी सध्यातरी पर्यटन हा उत्तम पर्याय आहे. निवडणूक लढवणार्‍या सर्व उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात आणि वचननाम्यात नगर शहराच्या पर्यटन विकासाची दिशा स्पष्ट करायला हवी.

अहिल्यानगर (अहमदनगर) शहर आणि परिसरात अनेक महत्त्वाची ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य आणि सामाजिक द्ृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळं आहेत. नियोजनबद्धरित्या पर्यटनविकास केला, तर शहरात रोजगार निर्मितीबरोबर उत्पन्नाची साधनं वाढू शकतील.

१. अहमदनगर शहराचा स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात यावा, ज्यामध्ये रस्ते, पथदिवे, पाणी, स्वच्छतागृह, कचरा संकलन, सुरक्षा, तसंच वास्तुंचं जतन व संवर्धन आदी गोष्टींचा समावेश असावा.

२. पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी माफक शुल्कात टुरिस्ट गाईडसह नियमित बससेवा उपलब्ध करण्यात यावी. शहर आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांच्या स्थानिक सहलींवर भर देण्यात यावा.

३. नगरच्या पर्यटनस्थळांची प्रसिद्धी व मार्केटिंग करणं आवश्यक आहे. बसस्थानके, रेल्वेस्थानक, विमानतळ, हाॅटेल्स, महत्त्वाचे चौक, सरकारी आणि सार्वजनिक स्थळांवर सचित्र माहितीफलक लावण्यात यावेत.

४. बसस्थानकं व रेल्वेस्थानकांवरील नियमित उदघोषणांमध्ये नगरच्या विविध पर्यटनस्थळांची माहिती सांगण्यात यावी. त्यामुळे एसटी, रेल्वेचे उत्पन्नही वाढेल.

५. नगर शहराकडे येणार्‍या सर्व प्रमुख रस्त्यांवर, बायपासवर, तसेच महत्त्वाच्या चौकांत माहिती फलक व अंतराच्या उल्लेखासह दिशादर्शक लावण्यात यावेत.

६. नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना देऊन हे स्थळ 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून जाहीर करण्यात यावं. दरवर्षी तीन दिवसांचा 'किल्ला महोत्सव' आयोजित करण्यात यावा. त्यामुळे कलावंतांना, रंगकर्मींना सांस्कृतिक मंच उपलब्ध होऊ शकेल.

७.  वन विभागाचे 'निसर्ग माहिती केंद्र', धरणे, तलाव पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतील. तिथे पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

८. शालेय अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरावर स्थानिक इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि पर्यटनाचा स्थळभेटींसह समावेश करण्यात यावा.

९. महापालिकेच्या, तसेच जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकात पर्यटन विकासासाठी भरीव तरतूद करण्यात यावी. 

१०. पर्यटन विकासाबाबत सर्व सरकारी खात्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र 'पर्यटन अधिकारी' नियुक्त करण्यात यावा.

११. नगरमध्ये 'पर्यटन माहिती केंद्र' सुरू करण्यात यावं. पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांचं, नकाशाचं दालन तिथं असावं. एक खिडकी सुविधा तिथे उपलब्ध करावी.

१२. सत्कार समारंभात शाल, नारळ आणि पुष्पगुच्छाऐवजी नगरच्या पर्यटनस्थळांची सचित्र माहिती असलेली पुस्तके, नगरच्या स्थानिक कलाकृती, स्मृतिचिन्ह असलेल्या भेटवस्तू देण्यात याव्यात.

नगर शहर आणि जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला, तर सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकेल. नगरकरांनी त्यांची मतं परखडपणे निवडणुकीतील उमेदवारांना सांगायला हवीत. तसं झालं, तर पुढच्या पाच वर्षांत नगरचं चित्र बदलेलं दिसेल.

अहमदनगरचं आता 'अहिल्यानगर' झालं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना साजेसं हे शहर बनवण्यासाठी किमान २५ हजार कोटींची तरतूद सरकारनंही करायला हवी.
 
- भूषण देशमुख (अहिल्यानगर)
लेखक ज्येष्ठ पत्रकार, इतिहासाचे अभ्यासक आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !