अहिल्यानगर - वांजोळी (ता. नेवासा) येथे शनिवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास काही संशयित गावात तोंडाला मास्क लावून फिरताना आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांच्या सतकर्तमुळे संशयितांनी परिसरातून पळ काढला. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी रात्री वांजोळी परिसरात गस्त दिली.
प्रतिकात्मक छायाचित्र |
याबाबत अधिक माहिती अशी की, वांजोळीतील एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवरील पागीरे वस्तीच्या कंपाऊंडवरील गेटजवळ शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तीन ते चार इसम दिसून आले. त्यांना वस्तीच्या कंपाऊंडवरील गेटजवळ फिरताना पाहण्यात आले.
एका लाल रंगाच्या दुचाकीवर दोन तर आणखी एका दुचाकीवर दोन असे चार जण असल्याचे नागरिकांनी सांगितले. घरातील लाईट लावल्याने तसेच नागरिकांच्या आवाजामुळे सदरचे इसम तेथून पसार झाले.
याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांच्या गस्ती पथकाने परिसरात येत पाहणी केली, मात्र त्यांना कोणीही आढळून आले नाही. वांजोळी गावात गेल्या महिनाभरापासून दोन ते तीन वेळा काही संशयित रात्रीच्या सुमारास फिरताना आढळून आले.
याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने याची दखल घेवून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.