मराठा आरमार दिन : 'हा' इतिहास कदापि विसरता कामा नये..


'24 ऑक्टोबर' हा दिवस 'मराठा आरमार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते.


शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली.

याचा फायदा पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, सिद्दी, यांनी उठवला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल, आदिलशाह, निजामशहा, कुतुबशाह, इ. यांनी देखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.

मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.

धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि... आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.

पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत.

मोगलांची ही स्थिती तर आपली काय.? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठ्यांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. 'जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी', तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. - छत्रपती शिवाजी महाराज

शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो - 'देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी I बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी I जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी I बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी II

हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये. शिवाजी महाराजांनी इ.स. 1656 मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला.

दि. 4 नोव्हेंबर 1656 पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर 1657 ते जानेवारी 1658 या कालावधीत शिवरायांनी 100 किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला.

या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा (तळ) असणे गरजेचे होते.

ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी ही जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते. आणि अखेर तो दिवस उजाडला. दि. 24 ऑक्टोबर 1657 रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली.

आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. यावर्षी या घटनेस 365 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली म्हणून '24 ऑक्टोबर' हा दिवस 'मराठा आरमार दिन' किंवा 'भारतीय आरमार दिन' म्हणून साजरा केला जातो.

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !