एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..
होतें कुरूप वेडे पिल्लू तयांत एक...
मन तळ्यात... मळ्यात
जाईच्या कळ्यात
मन नाजुकशी मोती माळ
तूझ्या नाजुकशा गळ्यात...
मन तळ्यात.. मळ्यात
कधी बसावे, मंद तळ्याकाठी. किती सुंदर कल्पना आहे ना, तळ्याची. तळ्याकाठी मित्रांसोबत खेळण्याचं बालपण... मोठेपणी मित्र, मैत्रिणीसोबत निवांत गप्पा मारत बसणारं स्वप्नांचं तरुणपण.
मन मोहरुन टाकणारी ही निसर्ग सृष्टी कधीतरी, कुठेतरी भावलेल्या तळ्याकाठी मलाही योग आलेला, निवांत मित्रांसोबत... तळ्याकाठी बसून गप्पा मारताना छोटे दगड हवेत भिरकवण्याचा, अन् उमटलेल्या तरंगांत स्वतःला शोधण्याचा..
दिवसही असतात असे, पुन्हा कधीतरी आठवतात. बेभरवशाच्या दिवसांत शुष्क.. निवांत कधी संघर्ष क्षणी फुलपाखरा सारखे विहार करणारे दिवस, उडूनही गेले कधीच. पंखांतले रंग मात्र तळहातावर सोडून.
खरंच किती सुखाचे क्षण येत असतात नाआयुष्यात आपल्या. फक्त मागे वळून पहावं लागतं, आठवणींचा सुगंध नव्यानं अनुभवण्यासाठी..!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)