आमचे कॉलेजचे दिवस, आमचं तारुण्य ज्या रस्त्याने पाहिलं.. ते शहराच्या मध्यवस्तीत असलेलं दिल्लीगेट.! या वास्तूच्या कमानीतून येत जात असताना आयुष्य सरत गेलं.
अनेक शतकांच्या बदलाची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक वास्तू. ज्यांच्यासाठी हा रोजचा रस्ता, तो खरा नगरकर..! कॉलेजच्या दिवसात संध्याकाळी मित्रांसोबत गावात फेरफटका मारायला जाताना हा रस्ता असणारच नेहमी.
याच दिल्लीगेट जवळील शमी गणपती मंदिर हे एक आमच्या शहराचं श्रद्धास्थान. आयुष्याची जडणघडण होत असताना खूप सारी स्वप्न असायची उराशी. संघर्ष, चिंता, दुःख, आनंद सोबत असताना "बाप्पा, माझ्यामागे नेहमी तुझा आशीर्वाद असू दे..." ही प्रार्थना करण्याचं स्थान म्हणजे "शमी गणपती."
हे मंदिर आमच्या जीवनाचा अविभाज्य भागचं. या वाटचालीत बाप्पाने आम्हा साऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत. इथे दर्शनासाठी आलो की सारा भूतकाळ नजरेसमोर येतो. जीवनाचा हा प्रवास.. अन् शमी गणपती मंदिर...
किती सुंदर नातं असतं ना आपल्या जीवनातलं. गणेशोत्सवाच्या या दिवसांत श्री शमी गणपती मंदिर रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाने छान न्हाऊन निघालं. काही असो, असं सगळं आहे म्हणून नगरकर असल्याचा अभिमान वाटतो.
- जयंत येलुलकर (अहमदनगर)