दिवाळी देशाच्या बहुतांशी भागात साजरी केली जाते. अर्थात प्रत्येक ठिकाणची पध्दत वेगवेगळी असली तरी वर्षातील मोठा सण म्हणून दिवाळी साजरी होते.
हा सण लोकप्रिय असून तो आपल्या संस्कृतीतील अनेक घटनांशी संबंधित असल्याने अनेक सणांचा समुच्चय असे त्याचे स्वरूप बनले आहे. आपल्या कडे ऋतुंची गणना करताना सहा ऋतू मानले जातात.
प्रत्येक ऋतुचा काळ दोन महिन्यांच्या मानला जातो. या गणनेनुसार 'आश्विन आणि कार्तिक' या दोन महिन्यांचा मिळून शरदऋतू मानला जातो. हा ऋतू समृध्दतेचे सफलतेचे स्वप्नपूर्तीचे प्रतिक बनला आहे.
प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नवीन वर्षाची गणना करण्यात येत असे. म्हणून वाढदिवसाला 'जीवेत शरद: शतम' असे म्हणतात.
प्रथम दिवस - वसुबारस. आपली कृषी संस्कृती आणि पशुपालन संस्कृती यांचा निकटचा संबंध आहे. आपले सारे सण कृतज्ञतेच्या पायावर रेखलेले आहेत. 'वसु' म्हणजे संपत्ती, 'बारस' म्हणजे त्यासाठी असलेली द्वादशी. या द्वादशीला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
खरंतर या दिवसाचा आणि दिवाळीचा संबंध नाही. पण दिवाळीच्या सणाला हा दिवस जोडून येतो. असो. अर्थात मी नेहमी म्हणते तसा भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपलं जगणं पशुधनावर आधारित आहे.
अशी मान्यता आहे की गाय ही समुद्र मंथनातून निर्माण झाली आहे. खरंतर तिची उपयोगिता जास्त असल्याने कृतज्ञता म्हणून या सणाची आखणी झाली असावी. या दिवशी सवत्सधेनु म्हणजे गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते.
समुद्रमंथनातून पांच गायी उत्पन्न झाल्या. त्यापैकी 'नंदा' नावाच्या गायीचा पुढील मंत्र म्हणून पूजा केली जाते. स्त्रियां या दिवशी एकभुक्त व्रत करतात.
'तत: सर्वमय देवी सर्वदेवैलड्;कृत्ये !'
'मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंन्दिनी!'
अर्थात - हे सर्वात्मक व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ पूर्ण कर.
प्रथा, परंपरा काहीही असोत. आपण कुठल्याही उपकारकर्त्याविषयी कृतज्ञ रहावं, निदान वर्षातून एकदा तरी त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी हेच आपले सण शिकवतात.
वर्षातून एक दिवस गायीला विश्रांती द्यावी तिचे वासरू तिच्याजवळ असावे. इतकं जरी आपल्याला कळलं तरी खूप झाले. आपल्या या अबोल उपकारकर्त्याविषयी कृतज्ञ राहूया. हेच लक्षात ठेवु या.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(सण, पदार्थ, पर्यावरण, या पुस्तकातून साभार)