भ्रष्टाचार ही पूर्ण जगाची समस्या आहे.याच पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेने मांडला. त्यानंतर पूर्ण जगात हा दिवस भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा होतो.
भ्रष्टाचार हा शब्द म्हणजे भ्रष्ट आचार. अनैतिक वागणे, आर्थिक गैरव्यवहार करणे, म्हणजेच भ्रष्ट आचरण करणे, म्हणजे भ्रष्टाचार करणे. जिथे नैतिक अपेक्षांचे पालन केले जात नाही, तिथे तिथे भ्रष्टाचार होतो आहे. जो तो मी भ्रष्टाचारी नाही, पण समोरचा भ्रष्ट आहे अशा वल्गना करत असतो.
यावरुन मला एक कथा आठवते. एक मूर्तिकार मूर्ती घडवत असतो. तो घडवत असलेल्या मूर्तीसारखी हुबेहूब मूर्ती तिथे तयार केलेली असते. एक पांथस्थ तिथून जात असतो. तो मूर्तिकाराला म्हणतो, 'तुम्हांला हुबेहूब दोन मूर्ती करुन द्यायच्या आहेत का?'
नाही, त्या मूर्तीच्या गालावरील तिळा एवढा टवका निघाला आहे. म्हणूनच दुसरी घडवत आहे". मूर्तिकार उत्तरला. "अहो मूर्तिकार कोण बघतंय एवढं तसंपण काहीही कळत नाही, द्यायची की तशीच'. इति पांथस्थ.
"अहो भाऊ दुसऱ्यांना नाही कळलं तरी मला तरी माहित आहे ना मी चुकीचा आहे. दुसऱ्यांकडून आपल्याबरोबर योग्य वागण्याची अपेक्षा आपण करतो तेव्हा सुरवात स्वतःपासूनच करायला हवी ना.
आज भ्रष्टाचार विरोधी दिन असताना मी माझ्यापासून प्रामाणिकपणाची कशी सुरवात करते याला महत्व आहे. भ्रष्टाचार का होत असावा.? लोकांच्या वाढत्या गरजा आणि बदलती मानसिकता. दारिद्र्य, बेकारी, अमर्याद गरजा, महागाई आणि तुटपुंजे उत्पन्न.
कुठेही जा, विशेषतः प्रशासकीय कार्यालयात. तिथे कामाला होणारी दिरंगाई.. वेळकाढूपणाची पध्दत, दिर्घ मुदतीची, गुंतागुंतीची अशी असल्याने लोक पैसे जाऊ देत, पण वेळ वाचू दे, या मानसिकतेमुळे भ्रष्टाचार फोफावण्यास उत्तेजन मिळत आहे.
याचे मूळ नैतिक मुल्यांचा ऱ्हास.. यावर अतिशय गंभीरपणे निदान बुध्दीजीवींनी तर विचार केला पाहिजे. अन याचे निराकरण करण्याचे उपाय शोधले पाहिजेत. यासाठी ठोस आणि नैतिकतेचा भक्कम पाया उभा केला पाहिजे.
घराघरातून, शाळांमधून नियम, व्यवस्था, अनुशासन, सत्यवादिता, पावित्र्य, आत्मशक्तिचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. व्यक्तिच्या व्यवहारात सत्य उतरले तर माणूस सामाजिक नैतिकता प्रतिष्ठीत करु शकतो.
वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे मानवाचे भौतिक जीवन सुविधापूर्ण झाले आहे.पण दिवसेंदिवस माणूस आतून अशांत होत चालला आहे. याचे कारण आपल्या जीवनात सदगुणाच्या सदाचारांचा अभाव आहे.
अर्थात भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंध कायदा आहे. गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्ष तुरुंगवासही आहे. निलंबनही होते. १९६३ ला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग स्थापन झाला. हा विभाग प्रशासनातील सचोटी राखण्याची भूमिका घेतो.
भ्रष्टाचाराविरुध्द माहितीचा अधिकार हे प्रभावी अस्त्र ठरु शकते. माहितीच्या अधिकारांमुळे प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता येऊ शकते. निरनिराळ्या मंत्रालयात आणि सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या विभागाकडे असते.
आपण ज्यांना आदर्श मानतो तेच असत्याचे अनुकरण करत असतात आणि हेच पिढ्यानपिढ्या शिकत रहातात.नेते भ्रष्ट, अधिकारी भ्रष्ट, अभिनेते भ्रष्ट आणि या साऱ्यांचे अनुकरण करणारी जनताही भ्रष्ट. असं हे वर्तुळ आहे. याला भेदून आपलं आपल्यालाच बाहेर पडायला हवं.
यातून आपल्याला कोणीही बाहेर काढणार नाही या दलदलीतून आपणचं बाहेर पडायला हवं. नाहीतर मी कधीच पाप केल नाही, म्हणून दुसऱ्यांवर टीकेचे दगड फेकायला तयार असणं.. यासारखा दांभिकपणा कुठलाच नाही.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)