जगण्यातील विरोधाभास : सहज मनातलं


कवी - समीर सामंत लिखित 'उबंटू' या चित्रपटातील हे खूप लोकप्रिय आहे. खूप जणांचा मोबाईल वर हे गाणं असतंच.. कवीने अगदी आर्तपणे या साऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.


'धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे,
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे', ही आशा करताना कवी आशावादी आहे तो पुढे म्हणतो,

'पुन्हा पसरो मनावर शुध्दतेचे चांदणे,
माणसाने माणसांशी माणसांसम वागणे..'
हे शुध्दतेचे चांदणे खरंच असतं का आपल्या मनात, जगण्यात विरोधाभास ठेवून माणसं जगत असतात.

माणुसकीचे प्रदर्शन स्टेटसला, रिंगटोन पुरते मर्यादित असते. पण वागताना, बोलताना माणसं किती दुटप्पी भूमिका घेत असतात. धर्म, जाती या पलीकडे जाऊन हे माणुसकीचं जिणे आपल्याला जगता येईल का.?

हल्ली जात, धर्म या भावना इतक्या टोकदार झाल्यात की इराण, इराकसारखी धर्मांधता इथं जन्माला येऊ घातली आहे. खरंच हे वातावरण माझ्यातल्या आईला अस्वस्थ करत आहे.

सोशल मीडिया तर दुसऱ्यांना ट्रोलींग करण्याचे दुधारी शस्त्र झाले आहे. आपण दुसऱ्यांना जखमा देता देता आपले हात रक्ताने माखले जात आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही.

राष्ट्र सेवा दलाने आम्हाला खरा एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा आहे. हा म्हणून काहीही अन्याय सहन करायचा नाही. फक्त हे लक्षात ठेवायचं अपराध्यांना शासन करताना एकही निरपराध बळी जाता कामा नये.

हे अर्थपूर्ण शिक्षण नव्या पिढीला आपण आपल्या वागण्यातून, आचारविचारातून द्यायला हवे. त्यासाठी जगण्यातील हा विरोधाभास टाळता यायला हवा. चांगुलपणाचा मुखवटा न पांघरता तो चांगुलपणा जगण्यात यायला हवा.

म्हणून या कवितेत शेवटी कवी म्हणतो, 'लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊल चालो पुढे, जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसांशी माणसासम वागणे'

हे खरं शिक्षण जगण्यातून, वाचनातून,मन समृध्द करणारे भावनिक प्रसंग, थोरामोठ्यांच्या सहवासात आणि अनुभवातून तावून सुलाखून मिळते. मग जगण्याचे सोनं होऊन आयुष्याचा उत्सव होतो. होय ना.? मंडळी तुम्हाला काय वाटते?

- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !