बारामती (पुणे) - महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी (Shocking News) समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) (Deputy CM Ajitdada Pawar) यांचे बुधवारी सकाळी बारामती (Baramati) येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला.
नेमकी घटना काय? - अजित पवार हे आगामी पंचायत निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. विमान लँडिंगच्या वेळी सुरुवातीला पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती, त्यामुळे विमानाची उंची वाढवण्यात आली होती. त्यावेळी दृश्यमानता सुमारे २ हजार मीटर इतकी होती.
लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यादरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि जोराने आदळून क्रॅश झाले. विमान कोसळताच त्याने भीषण पेट घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे, या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचारी अशा सर्वांचाच मृत्यू झाला आहे.
मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत -
- अजित पवार - उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
- एचसी विदिप जाधव - पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर
- कॅप्टन सुमित कपूर - पायलट
- कॅप्टन शांभवी पाठक - को-पायलट
- पिंकी माळी - फ्लाईट अटेंडंट
पंतप्रधान आणि गृहमंत्री उद्या बारामतीत - या घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये येणार आहेत.

