नुकतीच पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नरसापूर (Nasarapur) येथे घडलेली घटना ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाचे काळीज हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आनंदाने बागडण्यासाठी आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत जे घडले, ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे.
ज्या वयात हातामध्ये खेळणी असायला हवीत, अवतीभवतीचे जग काय आहे याची साधी ओळखही झालेली नसते, अशा निष्पाप कोवळ्या कळीचा घात कशासाठी व्हावा? हा प्रश्न आज प्रत्येक माता-पित्याला आणि संवेदनशील मनाला सतावत आहे.
विश्वासाचा झालेला अंत : लहान मुलांना चांगल्या-वाईटाची समज नसते. गोड बोलून किंवा काहीतरी दाखवण्याचे आमिष दाखवून त्यांना विश्वासात घेणे सोपे असते. नरसापूरच्या घटनेतही हेच घडले. एका निष्पाप विश्वासाचा गैरफायदा घेत अत्यंत अमानुषपणे तिचे आयुष्य संपवण्यात आले.
एका आईने नऊ महिने पोटात वाढवून, रात्रीचा दिवस करून ज्या लेकीला लहानाचे मोठे केले, ती एका क्षणात अशा क्रूर मानसिकतेला बळी पडते, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. पूर्वी गर्भातील मुलींना वाचवण्यासाठी आपण लढा दिला, कायदे केले. पण आता जन्माला आलेल्या या कोवळ्या कळ्या सुरक्षित आहेत का? हा प्रश्न अधिक गडद झाला आहे.
अशा घटना घडल्यानंतर समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, हीच संपूर्ण समाजाची भावना असते. परंतु, जेव्हा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्यातील त्रुटींमुळे किंवा इतर कारणांमुळे वेळीच कठोर जरब बसत नाही, तेव्हा गुन्हेगारांचे मनोबल (Criminal Mindset) वाढते.
गुन्हेगारांना कायद्याची (Law) आणि पोलिसांची (Police) भीती वाटलीच पाहिजे, तरच अशा कृत्यांना आळा बसेल. अशा प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या (Fast Track Court) माध्यमातून लवकरात लवकर आणि कठोरतम शिक्षा होणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात एक कडक संदेश जाईल.
बदलत्या काळातील पालकांची भूमिका : डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. सध्याचा काळ अत्यंत आव्हानात्मक आणि संवेदनशील बनत चालला आहे. अशा परिस्थितीत पालकांवर, विशेषतः मातांवर मोठी जबाबदारी (Responsibility) येऊन पडली आहे.
अति-विश्वास टाळा : आजच्या काळात कोणावरही आंधळा विश्वास (Blind Trust) ठेवणे धोक्याचे ठरत आहे. अगदी परिचयातील किंवा जवळच्या व्यक्तींकडेही मुलांवर लक्ष ठेवल्याशिवाय सोडू नका.
सुरक्षेला प्राधान्य द्या : आर्थिक सुबत्ता किंवा नोकरी-व्यवसाय नक्कीच महत्त्वाचे आहेत, परंतु आपल्या मुलांच्या सुरक्षेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. नोकरी सांभाळताना मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या, गरज पडल्यास वेळेचे योग्य नियोजन करा.
'गुड टच आणि बॅड टच'चे शिक्षण : अगदी लहानपणापासूनच मुलांना अनोळखी व्यक्तींकडून काहीही न घेण्याची आणि स्वतःच्या शरीराच्या सुरक्षिततेबाबत (Good Touch Bad Touch) सोप्या भाषेत समज देण्याची नितांत गरज आहे.
स्वसंरक्षणाचे धडे : मुलींना लहानपणापासूनच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे काळाची गरज आहे. केवळ अभ्यासातच नाही, तर स्वसंरक्षणाच्या विविध कलांमध्येही त्यांना पारंगत केले पाहिजे. पैसा आणि करिअर यापेक्षा आपली मुले अधिक मौल्यवान आहेत, हाच विचार केंद्रस्थानी ठेवून आता पावले टाकावीत.
आपल्या घरातील 'लक्ष्मी'चे स्वागत आपण घरात अत्यंत थाटामाटात करतो. पण तिचे हे हसणे-बागडणे कायम सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सदैव सतर्क राहावे लागणार आहे. आपल्या बागेतील कोवळ्या कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापूर्वी कुणी त्या खुडू नयेत, यासाठी संपूर्ण समाजाने व पालकांनी सजग राहण्याची हीच वेळ आहे.
- आशा सुधीर साठे (अहिल्यानगर)
