अहिल्यानगर - शहरातील हनुमान नगर (Hanuman Nagar) परिसरात सोमवारी कमालीचा गोंधळ पाहायला मिळाला. तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर परिसरातील कचरा आणि झाडांच्या फांद्या हटवण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या स्वच्छता पथकाला काही स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.
आंदोलकांनी थेट जेसीबी (JCB) आणि डंपरसमोर (Dumper) ठिय्या मांडल्यामुळे मनपाची स्वच्छता मोहीम सुमारे तासभर खोळंबली होती. या 'हायव्होल्टेज ड्रामा'मुळे (High Voltage Drama) परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. हनुमान नगर परिसरातील रस्त्यालगत पडून असलेल्या झाडांच्या फांद्या, हिरवा कचरा आणि वाढलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त होते.
यासंदर्भात नागरिकांनी मनपाकडे लेखी तक्रारही केली होती. मात्र, प्रशासनाला जाग येण्यासाठी तब्बल दोन महिने वाट पाहावी लागली. अखेर सोमवारी मनपाचे स्वच्छता पथक जेसीबी आणि डंपर घेऊन कचरा हटवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात होताच, परिसरातील काही नागरिकांनी अचानक वाहनांसमोर उभे राहून मोहिमेला विरोध सुरू केला. यावेळी मनपा कर्मचारी आणि विरोध करणाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. आंदोलकांनी जेसीबी आणि डंपरच्या हालचाली रोखल्याने स्वच्छतेचे काम तासभर ठप्प झाले होते.
विशेष म्हणजे, ज्या कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात आले म्हणून तक्रारी केल्या होत्या, तोच कचरा उचलण्यास विरोध केला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कामात अशा प्रकारे खोडा घातल्यामुळे भागातील सुज्ञ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण राड्याचे काही नागरिकांनी मोबाईलवर चित्रीकरण केले असून, हे व्हिडिओ आता समोर आले आहेत. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हनुमान नगरमधील नागरिकांमधून होत आहे.
वाद शांत झाल्यानंतर मनपाने कचरा हटवण्याचे काम पूर्ण केले असले, तरी या घटनेने स्थानिक पातळीवरील राजकारण मात्र चव्हाट्यावर आणले आहे. हनुमान नगर परिसरातील कचरा आणि झाडांच्या फांद्यांबाबत नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वी तक्रार केली होती.
दीर्घ प्रतीक्षेनंतर महानगरपालिकेने जेसीबी, डंपर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा हटविण्याचे काम सुरू केले. मात्र, त्याच कामादरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे मोहीम काही काळासाठी ठप्प झाली. त्यामुळे स्वच्छतेची मागणी आणि स्वच्छतेलाच विरोध? असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला.
वादातही कर्तव्याला प्राधान्य : कचरा हटविताना निर्माण झालेल्या वादामुळे काही काळ काम ठप्प झाले असले, तरी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संयम राखत आपले कर्तव्य पार पाडले. जेसीबी व डंपरच्या सहाय्याने परिसर स्वच्छ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेक नागरिकांनी स्वागत केले.

