कधी कधी एखादी व्यक्ती इतक्या जवळ येते, की आपल्याला वाटते अरे इतकी वर्ष मी हिच्याशिवाय कशी राहिले? इतकं छान मनाशी मनाचे नाते जुळते की तिच्या शिवाय आपलं पानही हलेनासं होतं.
ती व्यक्ती न कळत आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. आपण जिवापाड जपत रहातो,.मनाशी मन सांधलं जात असते. त्याला किंवा तिला हरण्याची कधी कधी आतमध्ये भिती वाटत रहाते. म्हणून नातंच जोडायचे नाही का?
नाती जोडायची प्रेमाची, आपुलकीची, मैत्रीची..! जगण्यातील हा एक सुंदर अनुभव आहे, त्याला पारखे नाही व्हायचे. विलगतेच्या वेदनांना सामोरे जायला लागेल म्हणून मैत्रीच्या, प्रेमाचा अनुभव घ्यायचाच नाही असं थोडीच आहे.
जोपर्यंत एकमेकांजवळ आहोत तोपर्यंत त्या नात्यांना आपले 100% द्यायचे, तो क्षण सुरेख जगावा, सुंदर अनुभवावा. यामुळे जगण्यातील मजा, सौंदर्य कळेल. यामुळे काय होईल एकमेकांच्या सहवासात घालवलेल्या क्षणांची आठवणींची साठवण आपल्या हृदयात कायमची राहिल.
सुखदुःख हे आपले समान सोबती आहेत. दु:ख येईल म्हणून जगणं सोडायचं नाही, ज्याला वेदना पेलायची ताकद असते त्याच्याच वाटणीला वेदना येत असतात. म्हणून कुणालाही जीव लावताना विचार नका करु.
कारण प्रेम करणं, नातं जोडणं ही हृदयस्थ मानवी साखळी वाढवत जाणं हे माणूसपणाचा सुंदर आणि खरा खरा गुण आहे. हे 'मोह मोह के धागे' आहेत, यातून सुटका नाही बरं.! पटतंय का मंडळी??
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

