अहमदनगर - कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. या काळात रिक्षाचालक मालक यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० हजार रुपये मदत मिळावी म्हणून अॅटो रिक्षाचालक-मालक संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली. मात्र शासनाने कोणताही विचार केला नाही. त्यामुळे २९ जून रोजी साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी जिल्हाधिकारी यांना तसे निवेदन दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे अॅटो रिक्षाचालकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. रिक्षा चालकांवर आजपर्यंत इतके दिवस रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आलेली नव्हती. तरी शासनाने रिक्षा चालकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही.
रिक्षा चालक व मालक सरकारला वाहन कर, इन्शुरन्स, पासिंग फी, इतर कर आणि डिझेल व पेट्रोल खरेदी कर भरत असतो. महाराष्ट्रामध्ये अॅटो रिक्षाधारक परवानाधारक २५ लाख आहे. चालक मालक मिळून ५० लाख आहेत. केरळ, दिल्ली, कर्नाटक या राज्यात १० हजार रुपये सरकारने रिक्षाचालक व मालक यांना आर्थिक मदत दिली.
महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त मदत म्हणून रिक्षाचालक व मालक यांना तातडीने २० हजार रुपये द्यावे म्हणून जिल्हा अॅटो रिक्षा चालक व मालक संघटनांनी निवेदन दिले आहे. शासनाने याचा कुठलाही विचार केला नाही. त्याच्या निषेधार्थ २९ जून रोजी साखळी पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कायदेशीर नियमांचे पालन करून बेमुदत उपोषण करण्यात येईल. मार्केटयार्ड, हमाल भवन, उपोषण असेल, असे अध्यक्ष घुले म्हणाले.