कोझिकोड (केरळ) - केरळ राज्यातील कोझिकोड विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. दुबईवरुन आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंग होत असतना कोसळले. या विमानात १८० प्रवासी होते. या अपघातामध्ये विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. विमानतळावरील प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे.
पावसामुळे विमान घसरुन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या विमानात १७४ प्रवासी होते. तसेच सहा क्रू मेंबर्स होते. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरवर या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केले आहेत. त्यावरुन हा विमान अपघात किती भयंकर होता, याची प्रतिची येते. दरम्यान, सध्या मदतकार्य सुरु असून जखमींवर तत्काळ उपचार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या विमान अपघाताचे नेमके कारण काय, याचाही शोध घेतला जात आहे.