अहमदनगर - रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून रोख रक्कम व मोबाइल लांबणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या क्राईम बँचने जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह या आरोपींना गजाआड केले. याप्रकरणी ट्रकचालक भुजंग नामदेव केदार (४२, जुना खर्डा रोड, पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
केदार हे रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करुन केबिनमध्ये झोपले असता चोरट्यांनी त्याच्या पाकिटातली रोख रक्कम, सोन्याचा ओम आणि मोबाइल असा एकूण २९ हजारांचा मुद्देमाल लांबवला. समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, हा गुन्हा अमोल होडगर (पिंपरी अवघड, ता. राहुरी) व पांडुरंग कोकरे (२५, कवडगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी केला असून सध्या ते पाथर्डीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, संदीप पवार, राम माळी, भागिनाथ पंचमुख, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, विनोद मासाळकर यांनी होडगर व कोकरे यांना शिताफीने अटक केली.
या आरोपींना गुन्हे शाखेने पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. होडगर याच्याविरुद्ध राहुरी, सोनई, एमआयडीसी आदी पोलिस ठाण्यांतही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आरोपींची अधिक चौकशी केली तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.