जिल्ह्यातील ६ सत्र न्यायालयात चालणार मोक्काच्या खटल्यांचे कामकाज
१८ सहायक सरकारी अभियोक्त्यांची 'विशेष सरकारी वकील'पदी नियुक्ती
अहमदनगर - जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत चालणारे खटले यापूर्वी नाशिकच्या न्यायालयात चालत होते. आता राज्याच्या विधी व न्याय विभागाने नव्याने काढलेल्या परिपत्रकानुसार नगर जिल्ह्यातील खटले नगरमध्येच चालणार आहेत.
विशेष सरकारी वकील मंगेश दिवाणे, अर्जुन पवार, अनिल ढगे |
जिल्ह्यातील ६ सत्र न्यायालयात या खटल्यामध्ये सरकार पक्षाचे कामकाज पाहण्यासाठी नगरच्या १८ विधिज्ञांची 'विशेष सरकारी वकील' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर गाजलेले 'पांगरमल दारुकांड खटला' व 'संदीप वराळ खून खटला'चे कामकाज आता नगरच्या न्यायालयात चालणार आहे.
अहमदनगर जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ सरकारी वकील मंगेश दिवाणे, सरकारी वकील अर्जुन पवार, अनिल ढगे, केदार केसकर, अनिल घोडके आदींची 'मोक्का' कायद्यांतर्गत चालणाऱ्या खटल्यांत सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे.
विशेष सरकारी वकील मंगेश दिवाणे हे नगर शहर वकील संघाचे माजी अध्यक्षदेखील होते. विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले मंगेश दिवाणे यांनी सोनई (ता. नेवासे) येथील अल्पवयीन मुलाच्या अपहरण व खंडणी प्रकरणात सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे.
तसेच शेवगाव येथील सराफाच्या दुकानावर पडलेल्या दरोडा खटल्यातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. तर विशेष सरकारी वकील अर्जुन पवार यांनी केडगाव येथील दीड वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या खटल्यांत प्रभावी बाजू मांडली होती.
या खटल्यात त्यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. तसेच राहुरी येथील एका मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात तब्बल ३० वर्षांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात त्यांना यश आले होते. हा खटला तपास यंत्रणा आणि सरकार पक्षासाठी आव्हानात्मक ठरलेला होता.
जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी 'कांडेकर खून खटल्यात' आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवली होती. याशिवाय 'मोक्का'अंतर्गत चालणाऱ्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेल्या वकिलांनीही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या सर्व विशेष सरकारी वकिलांचे सहकारी वकिलांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, पांगरमाल दारुकांड आणि संदीप वराळ हत्याकांडासोबतच जिल्ह्यातील इतर मोक्का'अंतर्गतच्या केसेसही आता स्थानिक जिल्हा सत्र न्यायालयांमध्ये चालणार आहेत. नगरच्या पोलिस अधीक्षकांनी गेले वर्षभरात सुमारे तीन ते चार गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केलेली आहे.
नियुक्ती मिळालेले विशेष सरकारी वकील
अहमदनगर सत्र न्यायालयात
१) सतीश. के. पाटील
२) अर्जुन बी. पवार
३) केदार जी. केसकर
श्रीगोंदा सत्र न्यायालयात
१) अनिल एम. घोडके
२) अनिल डी. ढगे
३) मंगेश वसंतराव दिवाणे
नेवासे सत्र न्यायालयात
१) एम. आर. नवले
२) अनिल डी. सरोदे
३) डी. एस. काळे
श्रीरामपूर सत्र न्यायालयात
१) पी. पी. गटणे
२) पुष्पा कापसे
३) संजय पाटील
कोपरगाव सत्र न्यायालयात
१) एस. एम. गुजर
२) बी. डी. पानगव्हाणे
३) गोरख के. मुसळे
संगमनेर सत्र न्यायालयात
१) एस. ए. वाकचौरे
२) बी. जी. कोल्हे
३) ए. आर. राठोड