इशानने अहमदनगरचे नाव देशात चमकवले - श्रीनिवास बोज्जा
अहमदनगर - येथील इशान निखिल परभाणे हा भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परीक्षेत पात्र ठरला आहे. म्हणून 'दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन'च्या वतीने अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व आडते बाजार मर्चंट असो.चे सचिव संतोष बोरा यांचे हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीनिवास बोज्जा म्हणाले की, इशान हा फटाका असोसिएशनचे उपाध्यक्ष निखिल परभाणे यांचा मुलगा असून त्याने महाराष्ट्रातातच नव्हे, तर भारतात नगरचे नाव उज्वल केले. त्याने भारतात चौदावा क्रमांक पटकावला ही भूषणावह बाब आहे.
या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातून दोनच विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामध्ये त्याला यश मिळाले. यापुढेही त्याने चांगले शिक्षण घेऊन भविष्यात 'भारतीय मिल्ट्री'मध्ये मोठे अधिकारी म्हणून सेवा करावी अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी संतोष बोरा म्हणाले की, इशानने जी कामगिरी केली, ती खरंच अभिमानास्पद गोष्ट असून त्यांच्या आई वडिलांचे कौतुक करणे कमी आहे. प्रामाणिक परिश्रम केले की यश निश्चितच संपादन करता येते, याचे उदाहरण म्हणजे ईशान आहे. त्याने असेच यश संपादन करून आई वडिलांचे व अहमदनगरचे नाव उज्वल करावे.
कार्यक्रमाचे स्वागत असोसिएशनचे उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे यांनी केले. तर आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष निखिल परभाणे यांनी मानले. यावेळी असोसिएशनचे जेष्ठ सदस्य जयप्रकाश बोगावत, सुनील गांधी, शिरिष चेंगेंडे, देवदास ढवळे, संतोष तोडकर, गणेश परभाणे, दाजी गारकर, अशोक कर्डिले, सागर हरबा, संजय सुराणा, उमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.