वृत्तसंस्था - विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे रविवारी एका कोविड केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला. हे केअर सेंटर एका हॉटेलात होते. या केअर सेंटरमध्ये २२ रुग्ण दाखल केलेले होते. हे सेंटर कृष्णा जिल्ह्यात आहे. तेथील आयुक्त मोहम्मद इम्तियाज यांनी याबाबत माहिती दिली आहे की, अग्नीतांडवाची घटना पहाटे ५ वाजता घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणात आंध्र प्रदेश देशात तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. या राज्यात दररोज २.१७ लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८५ हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ लाख २९ हजार ६१५ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. आंध्र प्रदेश राज्यात १ हजार ९३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथेही एका कोविड रुग्णालयात असेच अग्नीतांडव घडले हाेते. तेथे लागलेल्या आगीतही ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद येथे श्रेय कोविड रुग्णालयात ही आग लागली होती. त्यात ८ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. गुजरात पोलिसांनी याप्रकरणी रुग्णालयाचे ट्रस्टी भारत महंत आणि एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
(छायाचित्र सौजन्य - एएनआय वृत्तसंस्था)