भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
मुंबई - राज्यात नुकत्याच काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पण या बदल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच सीआयडी चौकशीची मागणीही केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला होता. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्यांवरील स्थगिती उठवण्यात आली हे आश्चर्यकारक आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने बदल्या रोखल्या होत्या मात्र नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठवण्यात आली.
या बदल्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला आहे. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली असल्याचा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. म्हणूनच या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. (image credit : TWITTER/ANI)