मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचे निधन झाले आहे. ते ५० वर्षांचे होते. अभिनेता रितेश देशमुख याने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी सकाळपासूनच निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित आणि प्रकाशित होत होते. त्यानंतर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयाने याचं खंडन करत दुपारी एकच्या सुमारास निशिकांत कामत यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते.
निशिकांत कामत सध्या व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर मात्र निशिकांत यांची मृत्यूशी झूंज अखेर संपली. कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासलेले होते. दि. ३१ जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल केलेले होते. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
निशिकांत कामत यांचा सिनेसृष्टीचा आढावा
निशिकांत कामत यांनी पाच वर्षापूर्वी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत 'दृष्यम', इरफान खानसोबत 'मुंबई मेरी जान' आणि 'मदारी', जॉन अब्राहमसोबत 'फोर्स' आणि रॉकी हँडसम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
मराठी चित्रपटांमध्ये 'डोंबिवली फास्ट' व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन 'लय भारी', 'फुगे' या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'सातच्या आत घरात' हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता.