तुझपे कोई गम की आंच आने नही दु..
कुरबान मेरी जान तुजपे, शाद रहे तु..
ऐ वतन वतन मेरे, आबाद रहे तु..
मै जहां रहु, जहाँ में याद रहे तु..
हे गाणं अनेकांच्या स्टेटसला दिसलं काल. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पुर्ण झाले, असं सोशल मिडिया वरूनच समजलं. सोशल मिडियावरती आज देशभक्तीचा महापुर ओसंडुन वाहत होता. वेगवेगळ्या परकीय आक्रमकांनी भारतावर राज्य केले ते राज्य पुन्हा मिळवताना अनेकांनी आपले प्राण गमावले खुप महत्प्रयासाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. परंतु आपलं देशप्रेम फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला बेगडीपणा मिरवण्यापुरतंच मर्यादित राहिलंय का ?
आपल्या देशाची शान अबाधित रहावी म्हणून आपण आपल्यामध्ये मुल्य रूजवायला कमी पडतोय का ? मला वाटतं करोनापासुन बचाव व्हावा म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरून लाठीचार्ज करण्याची वेळ जगात केवळ आपल्याच देशात आली असावी. थुंकु नका असे लिहिलेल्या बोर्डवरंच पचकन थुंकणारे महाभाग आपल्याकडे आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर रोज अपघाताने हजारोंनी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी नाही का होणार ? एक ना अनेक अशा समस्या आज देशापुढे आहेत. अनेकदा पालकच मुलांच्या समोर कायदे मोडताना दिसतात मग पुढची पिढी कशी काय मुल्यांचे पालन करणार ?
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अनेक देश सुख-सुविधांबाबत पुढे निघून गेले आहेत आपण मात्र अजून त्याच बेसिक प्रश्नांशी अजून झुंजत आहोत. सरकार आपल्याला कचराकुंड्या पुरवते. पण तरी तिथेही पाटी लावावी लागते कि कचरा हा कचराकुंडीतच टाका. द्राक्षांचा ट्रक पलटी झाला असताना मदतकार्य करायचे सोडून बायका- मुलांसमोर द्राक्षांचे कॅरेट गाडीत टाकून पळणारे बाप पाहिलेत मी..
पण आपली सर्वच जनता अशी नाहीये बरंका. याला काही अपवाद देखील आहेत. अशा मुल्यांची रूजवण लहान मुलांच्यात होऊन आपल्या भारताची वैभवशाली परंपरा अबाधित रहावी म्हणून झटणारे काहीजण सुद्धा आहेत. काल स्वातंत्र्यादिनी घडलेला हा प्रसंग खुप सुखावणारा आहे...
किल्ले धर्मवीरगड, तालुका : श्रीगोंदा !
औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंवर तब्बल २६ दिवस केलेल्या अमानुष छळाचा आणि अत्याचारांचा साक्षीदार असणारा एक भुईकोट किल्ला ! आमच्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे स्वयंसेवक संदिप खलाटे आणि त्यांची चिमुरड्यांची टिम काल धर्मवीर गडावर नित्यपुजेसाठी गेले होते. जिथे शंभुरांजांना औरंगजेबाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, त्या जागेवर असणार्या शौर्यस्तंभाचे पुजन करण्याआधी त्यांना तिथे अस्वच्छता आणि कचरा पडलेला दिसला.
शिवदुर्गच्या संस्कृतीप्रमाणे त्या चिमुरड्यांनी त्वरीत आसपास पडलेला प्लॅस्टिक कचरा, पाणी बॉटल, प्लॅस्टिक पिशव्या सर्व प्लॅस्टिक कचरा गोळा केला आणि सर्व कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. आणि नंतरच शौर्यस्तंभ आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करून त्या स्वयंसेवकांनी नित्यपुजन केले.
शेवटी मनोभावे छत्रपती शंभूराजेंना मानाचा मुजरा करून आसमंत भेदक ललकारी (गारद) देऊन त्यानंतर सर्व गड फिरून गडावरील मंदिरातील देवतांची पुजा करण्यात आली. हा प्रसंग खुप छोटा आहे. पण गेल्या ३ वर्षांपासून शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन करत असलेल्या कामाची पावती या प्रसंगामधून आज आम्हाला मिळाली.
इतिहासकाळात अनेक आस्मानी संकटांना सामोरे गेल्यानंतरही अनेक पावसाळे आणि वादळांना तोंड देत उभ्या असणार्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकोटांचे अस्तित्व वर्षानुवर्षे अबाधित रहावे, म्हणून सलग ३ वर्षांपासून दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी दुर्गम आणि दुर्लक्षित किल्यांवर ट्रेकिंगच्या आयोजन केले जाते.
सोबतच तिथे स्वच्छता अभियान आणि दुर्गसंवर्धनाचे आयोजन शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन करत आहे. यामध्ये महिला आणि लहान बालमावळ्यांची संख्याही मोठी असते. हीच प्रेरणा घेऊन शिवदुर्गच्या संस्कारात तयार झालेल्या चिमुरड्यांकडून काल धर्मवीर गडावर केली गेलेली स्वच्छता जणू स्वतंत्र भारताला सांगत होती की,
तुझपे कोई गम की आंच आने नहीं दु..
कुरबान मेरी जान तुज पे, शाद रहे तु..
ऐ वतन वतन मेरे, आबाद रहें तु..
मै जहां रहु, जहां में याद रहें तु..!
जय हिंद !
- सोमेश शिंदे (घारगाव, श्रीगोंदा, अहमदनगर)