परवा 'ॲमेझॉन प्राईम'वर शकुंतला देवी चित्रपट पाहिला. शकुंतला देवींविषयी मला 'मानवी संगणक' आणि 'एक ज्योतिषी तज्ञ' एवढे माहित होते. बाबांकडे त्यांचे एक ज्योतिष विषयक पुस्तक होते. अगम्य अशी गणिती प्रतिभा आकड्यांशी लीलया खेळणा-या शकुंतला देवींकडे होती.
दि. १८ जून १९८० रोजी लंडन येथे झालेल्या इंपीरियल कॉलेजात तिथल्या प्राध्यापकांनी दोन १३ अंकी संख्यांचा गुणाकार करण्यास सांगितले होते. या गुणाकाराचे अचूक उत्तर त्यांनी २८ सेकंदात दिले होते. सन १९९५ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली होती. त्यांची या विषयावरील विविध पुस्तके आहेत. गणिती विश्वविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते.
आता सिनेमाविषयी
एक स्त्री जेंव्हा आई होते आणि एक अतिमहत्त्वाकांक्षी स्त्री जेंव्हा आई होते, दोन्ही मध्ये फरक असतो. शकुंतला देवी चित्रपट पाहताना अशा अनेक महत्त्वाकांक्षी स्त्रिया डोळ्यासमोर तरळून गेल्या. ज्यांना मी प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांना करावी लागणारी धडपड, वेळ प्रसंगी करावे लागणारे त्याग, आणि त्यांना लागणारे समाजाचे सो कॉल्ड लेबल्स खूप काही आठवलं हा चित्रपट पाहताना..
हा चित्रपट फक्त स्त्री कशी महान, तिला किती त्याग करावा लागतो एवढंच नाही दाखवत तर अतियशस्वी स्त्रियांच्या मागे जो पुरुष असतो त्याच्या ही भावना अगदी व्यवस्थित मांडल्या आहेत. शकुंतला देवी यांच्या नवऱ्याचं प्रेम, त्यांचं त्यांच्या आई वडिलांशी असलेलं नात, त्यांच्या बहिणींचा मृत्यू, मानवी संगणक असणाऱ्या शकुंतला देवी यांचा करिअर प्रवास या बरोबरच आई आणि मुलीची तरल कहाणीही या चित्रपटात मांडली आहे.
हा चित्रपट विद्या बालन हिचा मास्टरपीस म्हणावा असा आहे.. जितक्या ग्रेसफुलपणे तिचा वावर आहे तितकाच अभिनय ही नेहमीप्रमाणे अप्रतिम..! विद्या बालन ही अभिनेत्री एकहाती चित्रपट यशस्वी करते, हे पुन्हा पुन्हा आपल्याला जाणवतं रहाते. शकुंतला देवी प्रत्यक्षात कशा होत्या, सिनेमॅटिक लिबर्टी किती घेतली हे सगळे विचार बाजूला ठेवून जे विद्या सादर करते त्यात अक्षरशः गुंतून गेल्यासारखं झालं.
तिला साथ ही उत्तम मिळाली आहे ती सान्या मल्होत्रा, अमित साध, जिशु सेनगुप्ता सारख्या सहकलाकरांची. चित्रपटाची कथा जितकी गुंतवून ठेवते, हसवते तितकीच शेवटी शेवटी डोळ्यात पाणीही आणते, सान्या आणि विद्याचा शेवटचा सीन आपल्याला डोळ्यातून पाणी काढायला लावतो.
हा चित्रपट पहाताना पुन्हा पुन्हा जाणवलेली एक गोष्ट म्हणजे आपण आईने असचं वागावं, तसचं असावं या चौकटी मनात उभ्या करुन असतो. त्या चौकटींना छेद देऊन आईसुध्दा एक माणूस असते, ह्या दृष्टीने आईकडे पहाल तर आपल्या आईच्या नक्की परत प्रेमात पडाल. तिच्या न समजलेल्या भावना पुन्हा उमगतील..
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)