घोडेगाव परिसरात गुरुवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गावकरी घराबाहेर पडले नाही. हा पाऊस रात्रभर सुरु होता. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी घरफोड्या करुन सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरुन नेली. हा प्रकार मध्यरात्री दीड वाजेनंतर घडल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे
नेवासे येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या एका युवकाचे घर दोन ते तीन दिवस बंद होते. याच घराशेजारी काही अंतरावर पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या व्यक्तीचे कुटुंब राहाते. त्यांना रात्रीची ड्युटी असल्याने ते घराला कुलूप लावून कामावर गेलेले होते. या दोन्ही घरांना कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी ते गॅसकटरच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करुन मुद्देमाल चेारुन नेला. याशिवाय आणखी दोन ठिकणी कुलूप तोँडून आत प्रवेश केला. परंतु, तेथे चोरट्यांना काही मिळाले नाही.
चोरटे सीसीटीव्हीत कैद !
शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. श्वानपथकही दाखल झाले. दरम्यान ग्रामस्थांनी मध्यंतरी वर्गणी करुन गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत. त्यात गुरुवारी पहाटे काही संशयास्पद हालचाली कैद झाल्या आहेत. पाोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.