नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतातील अनेक मंदिरे व देवस्थाने बंद ठेवली होती. परंतु, वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी चांगली बातमी आली आहे. गेले तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेले वैष्णोदेवी मंदिर आता दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. दि. १६ ऑगस्ट, रविवारपासून सर्व भक्तांसाठी हे मंदिर खुले झाले आहे. वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ रमेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
असे असले तरी सुरुवातीच्या दिवसांमध्ये २ हजार भक्त देवीचे दर्शन घेऊ शकतील. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु करण्यापूर्वी याठिकाणी एक दिवसात ५० ते ६० हजार भक्त देवीचे दर्शन घेत होते. वैष्णोदेवी मंदिर जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर ५ हजार २०० फूट उंचीवर आहे. तसेच जम्मूपासून ६१ तर कटारापासून १३ किलोमीटर अंतरावर आहे.
एका गुहेमध्ये वैष्णोदेवीच्या तीन पिंडींमध्ये देवी काली, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी या विराजित आहेत. ही यात्रा सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात १ हजार ९०० भक्त जम्मू-काश्मीरमधील आणि इतर राज्यातील १०० भक्त देवीचे दर्शन घेऊ शकणार आहेत. सीईओ रमेश कुमार यांनी सांगितले आहे की, यात्रा रविवारपासून सुरु होत आहे.
दर्शन घ्यायचेय ? मग हे वाचा
खालील लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
www.maavaishnodevi.org
सूचना
फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप असणे अनिवार्य
मास्क वापरणे आवश्यक
सोशल डिस्टेंसिंग पाळावे लागणार
सॅनिटायझेशनकडे विशेष लक्ष आवश्यक
यात्रेकरूंची थर्मल स्क्रिनींगही केली जाईल
यांना दर्शनाची परवानगी नाही - दहा वर्षांखालील मुलांना, गर्भवती महिलांना, साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना दर्शनाची परवानगी नाही. यासोबतच ज्या लोकांना कोविडशी संबंधित कोणतेही लक्षण आढळून आल्यास त्यांनाही दर्शनाची परवानगी मिळणार नाही, असेही देवस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Image Source _ Twitter |