मुंबई - रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अत्याचार व हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहिल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुटुंबियांना सांगितले.
पीडित मुलीच्या वडिलांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची वेळ मागितली होती. यावेळी झालेल्या या चर्चेत मुलीचे आई-वडील, आजोबा, पंचक्रोशीतील सरपंच तसेच मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, दक्षिण रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे सहभागी झाले.
तसेच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक, अनिल पारस्कर, रोहा येथील उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, मराठा क्रांती मोर्चाचे विलास सुद्रीक, राजन घाग, रूपेश मांजरेकर, नामदेव पवार, विवेक सावंत आदी मंडळी सहभागी झाली होती.
याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून यापूर्वीच नियुक्ती झाली असून, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाईल. तसेच महिला अत्याचारांसंदर्भात अधिक कठोर कायदा करण्याची सरकारची तयारी आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व तिच्या हत्येची घटना ही दुर्देवी आणि मनाला यातना देणारी आहे. मुलीच्या पालकांच्या भावनांची कदर करून या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य शासन कोणतीही कसूर ठेवणार नाही.