महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

नवी दिल्ली - वैज्ञानिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्रातील चार शास्त्रज्ञांना केंद्र शासनाचा मानाचा ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी एकूण सात श्रेणींमध्ये 14 वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे येथील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने (सीएसआयआर) संस्थेच्या एसएस भटनागर सभागृहात आज 79 व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान,भूविज्ञान मंत्री तथा सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक तथा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांनी वर्ष 2020 च्या ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ विजेत्या वैज्ञानिकांच्या नावाची घोषणा केली. एकूण सात श्रेणींमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण 14 वैज्ञानिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 5 लाख रूपये आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमध्ये महाराष्ट्राला पुरस्कार 

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमधील दोन्ही पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे. सीएसआयर प्रणित पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता हे या श्रेणीत विजेते ठरले असून त्यांना शांती स्वरूप भटनागर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आयआयटी मुंबईच्या दोन वैज्ञानिकांना पुरस्कार

आपल्या कार्यकतृत्वाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणाऱ्या मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळया श्रेणींमध्ये हा पुरस्कार पटकाविला आहे. संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सुर्येंदू दत्ता यांना पृथ्वी, वातावरण, समुद्री व ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाला आहे. 

गणित विभागाचे शास्त्रज्ञ डॉ यु के आनंदवर्धन  यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. एचआरडीजी आणि सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळांचे प्रमुख ए चक्रवर्ती तसेच अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !