मुंबई - राज्यात १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात ४ हजार १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३ हजार ८५८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ९,५७९ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मे २०२० पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ जून २०२० या काळात १ लाख ५४ हजार २६९ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख ४९ हजार ४२९ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत.
मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. दि. 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत.
दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात ८९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५० आरोपींना अटक केली आहे. २५ लाख ३० हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. २४ मार्च, २०२० पासुन दि. १५ सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण १८,०७४ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९,७६४ आरोपींना अटक करण्यात आली असून १,६८० वाहने जप्त केली. ४१ कोटी ७७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून commstateexcise@gmail.com ई-मेल आहे.