सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती रिक्षा सेनेची वाकड मध्ये निदर्शने
पिंपरी : वाकड येथे आपल्या विविध मागण्यासाठी सरकारच्या विरोधात तिव्र निदर्शने करत क्रांती रिक्षा सेनेने अक्षरशः टाहो फोडला. या प्रसंगी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या बाबत दाद मागताना फलके हातात घेऊन सरकार विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोना विषाणू संसर्गामुळे रिक्षा व्यवसाय पुर्णपणे बंद पडलेला असून तो डबघाईस आला आहे. भीतीने प्रवासी रिक्षात बसत नाहीत. दोन प्रवासी पाहिजे तेवढे भाडे देत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. आमचे एक वेळेचे पोट भरणे अवघड झाले आहे. या बिकट परिस्थितीत फायनान्स कंपन्या गुंड पाठवून रिक्षा चालकांकडून कर्जाच्या हप्त्याची जबरदस्ती करत आहेत. हप्त्याचा तगादा लावत आहेत. त्यामुळे आमची मानसिकता खराब झाली आहे.
आम्ही खायचं काय, जगायचे कसे हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. अस असताना सरकारने आम्हाला कोणतीही मदत केली नाही. दिल्ली, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांनी रिक्षा चालकांना लोकडाऊनमध्ये आर्थिक मदत केली. मात्र महाराष्ट्र सरकार कडे गेल्या सहा महिन्यापासून क्रांती रिक्षा सेनेसह इतर संघटनांनीही अनेक वेळा मागण्या करून देखील सरकार आमच्या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, अशा तीव्र भावना रिक्षा चालकांनी व्यक्त केल्या.
आंदोलनात तानाजी खोटे, नितीन कुंभार, गणेश तोरमल, सिद्धार्थ कुंभार, गणेश ढेरे, शिवाजी कुंभार, जितू खिलारे, योगेश कुंभार, रामा स्वामी, सुरेश काळे आदी रिक्षा चालक, कार्यकर्ते उपस्थित होते.
रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या
-ओला, उबेर, जुणून आदी खाजगी कंपन्या बंद करा
-खाजगी ऍप कंपन्या बंद करून त्याच धर्तीवर शासनानेच ऍप कंपनी चालू करावी
-आमच्या रिक्षा शासनाने ताब्यात घेऊन त्याच रिक्षावर आम्हाला कायम स्वरूपी नोकरी द्यावी (उदा .एसटी, पीएमपीएल च्या धर्तीवर)
-आर्थिक पॅकेज जाहीर करा (एक लाख अनुदान द्या)
- रिक्षांचे कर्ज माफ करा.
-रिक्षा चालकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या.
क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने चालूच ठेवणार आहेत आणि जो पर्यत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तो पर्यत आम्ही कर्ज हप्ता, रिक्षाची पाशिंग, इन्शुरन्स भरणार नाही. - श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा सेना