मुंबई : कोविड -19 रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'कोविड कवच मोबाईल ॲप' सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने 'कोविड कवच मोबाईल ॲप'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सर्व अधिष्ठाता उपस्थित होते. जीवन ज्योत कॅन्सर अँड रिलीफ केअर ट्रस्टचे हरकचंद सावला, शस्त्र लॅब्सचे सुनील नायर, शस्त्र लॅबचे हेल्थकेअर कन्सल्टंट विजयकुमार अय्यर, शिवांगी कुंभार यांच्या प्रयत्नाने कोविड कवच हे ॲप तयार करण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जग कोविड -19 आजाराशी मुकाबला करीत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी गेल्या काही दिवसात कोविड -19 चे रुग्ण कमी होण्यास तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत आहे. 'कोविड कवच मोबाईल ॲप'चा फायदा अधिकाधिक कोविड-19 चे रुग्ण कमी करण्यासाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
काही वेळा कोविड -19 झालेल्यांना पुन्हा कोविड होण्याचा धोका असतो किंवा कोविड -19 मुळे दुसरे काही आजार होण्याची शक्यता दिसून येते अशा वेळी 'कोविड कवच मोबाईल ॲप' रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी तसेच रुग्णांचे निरीक्षण करण्यासाठी महत्वाचे ठरेल. या ॲपचा अधिकाधिक उपयोग कोविड रुग्णांचा ट्रॅक ठेवणे, कोविडबाधित रुग्णांचे निदान करणे आणि त्यांना वेळेत उपचार देणे यासाठी होणे आवश्यक असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाता, डॉक्टरांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.