प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप येळवंडे यांचा राज्यपालांकडून सन्मान

अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य केल्याबद्दल नेवासा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप येळवंडे यांना नुकतेच राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी मुंबई  येथे राजभवनात झालेल्या सोहळ्यात कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यानिक अधिकारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्ती, कक्षसेवक, भट्टीचालक, क्ष-किरण अधिकारी, परिसेविका अशा सुमारे ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. 

कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. गौरविण्यात आलेल्या कोरोना योद्ध्याला प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा देखील राज्यपालांनी यावेळी केली.

सीमेवर लढून सैनिक देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांनी रुग्णांचे रक्षण करुन त्यांना जीवनदान देण्याचे काम केले आहे. कोरोना रुग्णांची सेवा करताना ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यांना राज्यपालांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, आरोग्य विभागाकडे सामान्य माणूस आशेने पाहत असून त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागत, आस्थापूर्वक चौकशी करीत रुग्णांना बरे करुया, असे आवाहन टोपे यांनी केले. राज्यातील रुग्णांना अधिक चांगली आणि दर्जेदार सेवा देण्याकरिता मिशन मोडवर काम करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !