आजी-आजोबांसमोर त्याने नातीला ओढून नेले

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ३ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिला फरफटत जंगलात नेले. या मुलीच्या आजी-आजोबांनी तिला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. गुरुवारी सकाळी या मुलीचा मृतदेह दरीत सापडला आहे.

या हल्ल्यात अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पाथर्डीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मढी गावातील डोंगरपायथ्याला असलेल्या वस्तीवर श्रीधर साळवे, विजय साळवे यांची घरे आहेत. बुधवारी रात्री विजय साळवेंची पत्नी उषा घराबाहेर आली, त्या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. विजय यांनी प्रतिकार करत पत्नीची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. 

काही वेळाने श्रीधर साळवे यांची नात श्रेया सुरज साळवे लघुशंकेसाठी घराबाहेर येताच बिबट्याने तिच्यावर झडप घातली. नातीचा आवाज ऐकून आजी-आजोबा धावले. त्यांनी लगेच कानिफनाथगडावर फोन करून मदतीचे आवाहन केले. गावातील ३००-४०० तरुण, वन कर्मचारी मदतीसाठी धावले. रात्रभर शोधाशोध करूनही मुलगी सापडली नाही.
 

दरम्यान गुरुवारी सकाळी घरापासून सुमारे १ किमीवर दरीत तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. दरम्यान या हल्ल्यात आणखी एक महिलाही जखमी झाली आहे. या घटनेमुळे मढी गावामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !