नवी दिल्ली - देशभरात योगाचा प्रचार व प्रसार करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी नुकताच एक अचाट प्रयोग करण्याचा प्रयतन केला. पण तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. विविध प्रकारचे योगप्रकार करण्यासाठी रामदेव बाबा प्रसिद्ध आहेत. यावेळी त्यांनी थेट हत्तीवर बसून योगप्रकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तोल जाऊन ते खाली पडले.
रामदेव बाबांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात ते हत्तीवर बसून योग करत असताना अचानक पडल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, हत्तीवर बसून योग करत असताना अचानक हत्ती पुढे सरकला आणि बाबा रामदेव खाली पडले. परंतु यात बाबा रामदेव यांनी कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
ही घटना सोमवारी मथुरेतील महावनमधील आश्रमात घडली. सोशल मीडियावर या घटनेची खिल्ली उडवली जात आहे. एका यूजरने बाबा रामदेव यांना जोकर म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहीले, बाबा जीडीपीसाठी नवीन मस्कट होऊ शकतात. रामदेव बाबा यांचा हा प्रयोग त्यांचा अंगलट आला आहे, हे मात्र खरे.