पुणे - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने सत्तेत आले. जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मनात या सरकारविषयी रोष आहे. त्याचा प्रत्यय बिहार विधानसभा तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील पोटनिवडणुका जिंकल्यानंतर आला आहे. ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विजेचा शॉक दिला; त्या सरकारला शॉक देण्याची वेळ आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुणे पदवीधर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी फडणवीस यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कार्यकर्त्यांना एकजुट दाखवून देण्याचे आवाहन केले.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकारने दिवाळीपूर्वी घोषणा करूनही शेतकर्यांना अद्याप अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही. कोरोना काळात हातावर पोट असणार्यांपासून बाराबलुतेदार, पथारीवाले, रिक्षाचालक व जनतेसाठी सरकारने कुठलीच मदत जाहीर केली नाही. मदत मागितल्यास राज्य सरकार केंद्रसरकारकडे बोट दाखवत आहे.
वीज बील 10 टक्क्यांनी कमी करू, असे सांगणार्या सरकाने अचानक शब्द फिरवून जनतेला मोठा शॉक दिला आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे. कार्यकर्ते व जनतेने राज्य सरकार विरोधात टिका- टिपण्णी केल्यास त्यांना थेट जेलमध्ये टाकले जात आहे.
आम्ही देखील सत्तेत होतो. भाजपने बिहार विधानसभेसह कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील पोटनिवडणूका जिंकल्याने जनतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पसंती आहे. कारण ‘जनतेला बोलघेवडे नाही तर कर्मयोगी लोक आवडतात’ अशी टीका त्यांनी केली आहेे.