अहमदनगर - पोस्टाच्या बचत खात्यात सध्या सर्वात कमी रकमेची मर्यादा ही ५० रुपये आहे. मात्र, आता ११ डिसेंबरपासून या बचत खात्यात किमान पाचशे रुपये असणे आवश्यक आहे. अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी. भोसले यांनी ही माहिती दिली आहे.
पोस्ट ऑफीस मधील ज्या बचत खातेदारांच्या खात्यावर पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम आहे, त्यांनी ११ डिसेंबरपर्यंत त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम कमीत कमी रुपये पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
ज्या खातेदारांच्या बचत खात्यातील रक्कम ११ डिसेंबरनंतर पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर असा बचत खात्यातून मेंटेनन्स चार्जेस म्हणून शंभर रुपये आणि कर एवढी रक्कम वजा केली जाईल तसेच खात्यातील शिल्लक रक्कम जर १०० रुपयांपेक्षा कमी असेल तर अशी बचत खाती प्रणालीमधून (सिस्टीम) आपोआप बंद होतील.
त्यामुळे पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असलेल्या खातेदारांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ११ डिसेंबर, २०२० पर्यंत बचत खात्यात किमान पाचशे रुपये शिल्लक राहतील, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.